Spread the love

नांदगावच्या सोनाली पठाडेची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड!

विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन; कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

नांदगाव, ता. ४ : दिपक अंभोरे

येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची इयत्ता बारावी कला शाखेतील विद्यार्थिनी कु. सोनाली दीपक पठाडे हिची शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नांदगाव महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हिरावाडी, नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुलात विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नांदगाव महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

या स्पर्धेत सोनाली पठाडे हिने चपळ हालचाली, तंत्रशुद्ध खेळ आणि उत्कृष्ट बॉक्सिंग कौशल्याचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावी वर्चस्व मिळविले. तिच्या दमदार कामगिरीच्या जोरावर तिने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

सोनालीच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक अमित बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. संजय मराठे, उपप्राचार्य डी. एम. राठोड, कला व वाणिज्य विभागप्रमुख जी. व्ही. बोरसे, विज्ञान विभागप्रमुख पी. एन. जपे तसेच महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी तिचे अभिनंदन केले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

सोनालीला या यशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डी. एम. राठोड, क्रीडा संचालक लोकेश गळदगे आणि क्रीडा सहाय्यक दिलीप अहिरराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सोनालीच्या राज्यस्तरीय निवडीमुळे नांदगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात तिचे कौतुक होत असून, आगामी स्पर्धेतही ती उल्लेखनीय कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version