कुऱ्हा हरदो शाळेत मराठी अभिजात भाषा सप्ताह उत्साहात संपन्न!
जात्यावरील ओव्या, भुलाबाईची गाणी, अभंग आणि प्रश्नमंजुषेतून मराठी भाषेचा जागर; विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोककला व संस्कृतीचा घेतला अनुभव
कुऱ्हा हरदो (प्रतिनिधी) : मराठी भाषेचा समृद्ध वारसा, साहित्यपरंपरा आणि लोकसंस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे आयोजित ‘मराठी अभिजात भाषा सप्ताहा’ची आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत उत्साहात सांगता झाली. शाळेतील शिक्षिका डॉ. वैशाली संसारे यांच्या संकल्पनेतून ३ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या सप्ताहात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेतले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे होते. सुरेश भट यांच्या ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी; जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी’ या कवितेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भुलाबाई पूजन करून पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
ओव्या, अभंग आणि भुलाबाईच्या गीतांतून लोकसंस्कृतीचा जागर
सप्ताहादरम्यान जात्यावरील ओव्या, भुलाबाईची पारंपरिक गाणी, अभंग, मराठी साहित्यवाचन आणि समूहगायन असे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी म्हणी, वाक्प्रचार, कवी, लेखक आणि कथासंग्रह यांची माहिती संकलित केली. तसेच विद्यार्थ्यांच्या भाषिक ज्ञानात भर घालण्यासाठी प्रश्नमंजुषेचेही आयोजन करण्यात आले.
जात्यावरील ओव्या आणि भुलाबाईच्या गाण्यांच्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा, समूहगायन आणि लोकपरंपरेतील गीतांच्या सादरीकरणातून भुलाबाई उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. आनंददायी वातावरणात पारंपरिक लोककला व संस्कृतीचे जतन व्हावे आणि विद्यार्थ्यांना लोकपरंपरेची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
अभिजात भाषेचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत
मराठी अभिजात भाषा म्हणजे काय, भाषेचा ऐतिहासिक वारसा कोणता आणि भारतातील अभिजात भाषांचे महत्त्व काय, याविषयी डॉ. वैशाली संसारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सोप्या भाषेत माहिती दिली. भाषेचे संवर्धन, साहित्याचे वाचन आणि पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचे जतन यांचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील साहित्यिक समृद्धीबरोबरच लोकजीवनाशी जोडलेल्या परंपरांचा अनुभव घेता आला. पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष सहभागातून भाषा आणि संस्कृतीची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न या सप्ताहातून करण्यात आला.
शिक्षकांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वी
शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे, पुनम वाघोदे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे, कुमुदिनी माहुरे आणि डॉ. वैशाली संसारे यांनी विशेष सहकार्य केले. कुमुदिनी माहुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
मराठी भाषेची गोडी निर्माण करणे, साहित्याविषयी आवड वाढविणे आणि लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, या उद्देशाने आयोजित केलेला हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि आनंददायी ठरला.
