भालोद महाविद्यालयात डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन साजरा
‘सप्तक्रांतीशिवाय सामाजिक समता शक्य नाही’; प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांचे प्रतिपादन
भुसावळ प्रतिनिधी
अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द लोकशाहीत जिवंत असली पाहिजे. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी यासाठीच आयुष्यभर संघर्ष केला. वर्णभेद, जातिभेद आणि स्त्री-पुरुष विषमता नष्ट करण्यासाठी सप्तक्रांतीची संकल्पना महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.
सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्रख्यात समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक आणि राजकीय नेते डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘सप्तक्रांती आणि सामाजिक समता’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. डॉ. चव्हाण बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. विकास म्हणजे माणसाच्या प्रतिष्ठेची, स्वातंत्र्याची आणि समानतेची प्रस्थापना होय, असे त्यांनी सांगितले. समाजपरिवर्तनाची जबाबदारी केवळ सरकार, राजकीय पक्ष किंवा सामाजिक कार्यकर्त्यांची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा डॉ. लोहिया यांच्या विचारांचा गाभा असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेष व्याख्यानात प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांनी डॉ. लोहिया यांच्या समाजवादी विचारप्रणालीचे विवेचन केले. सप्तक्रांतीची संकल्पना, सामाजिक समता, जातीय विषमतेचे निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. लोहिया यांच्या विचारांची आजही प्रासंगिकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांना भारतीय राजकीय विचारवंतांचे योगदान समजते, तसेच सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले.
यावेळी खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगरचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. ए. महाजन यांचे स्वागत डिंपल भालेराव हिने ग्रंथभेट देऊन केले. प्राचार्य प्रा. डॉ. किशोर कोल्हे यांचे स्वागत मोक्षदा कोंगे हिने, तर प्रा. डॉ. गणेश चव्हाण यांचे स्वागत अतिकेश माळी याने ग्रंथभेट देऊन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
