Spread the love

धुळ्यात मनसेची ‘एक सही संतापाची’ मोहीम; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

एसआयआर मोहिमेवरून मनसे आक्रमक; जुन्या मनपा चौकात नागरिकांच्या सह्या घेत व्यक्त केला संताप

धुळे | प्रतिनिधी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) धुळ्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने ‘एक सही संतापाची’ मोहीम राबविण्यात आली. जुन्या मनपा चौकात आयोजित या मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी कार्यकर्त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्या सूचनेनुसार, मनसेचे महानगराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

एसआयआर मोहिमेवर मनसेचे गंभीर आरोप

एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) मोहिमेच्या माध्यमातून कथित मतचोरीला मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी खतपाणी घातल्याचा आरोप मनसेने केला आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असूनही तिच्या कारभारातील पारदर्शकतेबाबत संशय असल्याची भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत मनसेने ‘एक सही संतापाची’ मोहिमेद्वारे आपला निषेध नोंदविला. या मोहिमेत नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या.

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

या वेळी मनसेचे महानगराध्यक्ष संजय सोनवणे, राजेंद्र खैरनार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version