Spread the love

‘वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी धुळे दणाणले; मोदी-शहांच्या राजीनाम्याची मागणी!

समविचारी पक्षांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; निवेदन देण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचा आंदोलकांचा आरोप, जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला निवेदन चिकटवून निषेध

धुळे | प्रतिनिधी

‘वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी धुळे शहरातील राजकीय वातावरण तापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध समविचारी पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला निवेदन चिकटवून निषेध व्यक्त केला.

केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

देशातील सद्यस्थिती, संविधानिक मूल्ये आणि लोकशाही व्यवस्थेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशात अराजकता निर्माण होत असल्याचा आणि संविधानिक तत्त्वांना बाधा पोहोचत असल्याचा आरोप आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केला. या पार्श्वभूमीवर दोघांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट, संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक संघटना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह विविध समविचारी राजकीय पक्ष सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

निवेदनावरून जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी निवेदन देण्यास मज्जाव केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहनाला निवेदन चिकटवून आपला निषेध नोंदवला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या आंदोलनातून समविचारी पक्षांनी केंद्र सरकारविरोधात एकजूट दाखवत मोदी आणि शहा यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा आक्रमकपणे मांडली.

विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी

या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, निंबा मराठे, सत्यशोधक संघटनेचे सिद्धार्थ जगदेव, वंचित बहुजन आघाडीचे शंकर खरात, बहुजन समाज पार्टीचे सिद्धार्थ पारेराव व राज चव्हाण, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक व मनोज पाटील, मनसेचे संतोष मिस्त्री व धीरज पाटील यांच्यासह विविध समविचारी पक्षांचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version