Spread the love

दुष्काळी परिस्थितीमुळे रोषमाळ बु. व छापरी येथील अश्व स्पर्धा रद्द!

धडगाव पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला आयोजकांचा सकारात्मक प्रतिसाद; १८ आणि ३१ ऑक्टोबरच्या स्पर्धा होणार नाहीत

धडगाव, जि. नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यासह धडगाव तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक परिस्थितीचे भान राखत धडगाव तालुक्यातील रोषमाळ बु. आणि छापरी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या अश्व स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धडगाव पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्पर्धा आयोजित न करण्याचे मान्य केले.

पोलीस ठाण्यात महत्त्वाची बैठक

सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या जाहिरातीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रोषमाळ बु. येथे, तर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी छापरी येथे अश्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता धडगाव पोलीस ठाण्यात बैठक पार पडली.

पोलीस निरीक्षक सुनील भानुदास भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील आणि तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. अशा परिस्थितीत अश्व स्पर्धांचे आयोजन टाळावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

आयोजकांची सहमती; स्पर्धा न घेण्याचा निर्णय

पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आयोजकांनी यंदा स्पर्धा आयोजित न करण्याचे मान्य केले. बैठकीला अश्व स्पर्धांचे आयोजक हारसिंग मल्या पावरा, धनसिंग दादला पावरा, रोषमाळचे पोलीस पाटील राजू पावरा आणि फत्तेसिंग पावरा उपस्थित होते. त्यांनी पोलीस प्रशासनाच्या भूमिकेशी सहमती दर्शविली.

त्यामुळे रोषमाळ बु. येथील १८ ऑक्टोबर आणि छापरी येथील ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अश्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन धडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बी. भाबड यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version