Spread the love

सातपुडा विद्यालयातील नवदुर्गांनी गिरविले स्वसंरक्षणाचे धडे!

अल्पा अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली ५०० विद्यार्थिनींना लाठी-काठी प्रशिक्षण; आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मनिर्भरतेचा संदेश

धुळे, प्रतिनिधी :

बदलत्या सामाजिक परिस्थितीत मुलींनी सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनण्यासोबतच कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करण्यासाठी सज्ज असणे आवश्यक आहे. याच उद्देशाने नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे येथील सातपुडा शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतील सुमारे ५०० विद्यार्थिनींना लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. १३) हा उपक्रम राबविण्यात आला.

नगावबारी परिसरातील सातपुडा शिक्षण संस्थेच्या प्रांगणात बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान, धुळे महानगरपालिका आणि किरणकुमार बहुद्देशीय शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये आत्मसंरक्षणाची जाणीव निर्माण करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

५०० विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

सातपुडा माध्यमिक विद्यालय तसेच आश्रमशाळेतील सुमारे ५०० विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. तज्ज्ञ प्रशिक्षक अशोक जाधव, ऋतुजा जाधव आणि नारायणी जाधव यांनी विद्यार्थिनींना लाठी-काठी चालविण्याचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान विविध तंत्रे, त्यातील बारकावे आणि स्वसंरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची माहिती देण्यात आली.

नवरात्रोत्सवातील नवदुर्गांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाने विद्यार्थिनींमध्ये धैर्य, शिस्त आणि आत्मनिर्भरतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला. संकटाच्या वेळी घाबरून न जाता प्रसंगावधान राखणे आणि स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, याचे महत्त्वही या प्रशिक्षणातून अधोरेखित करण्यात आले.

मुलींनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज : अल्पा अग्रवाल

उपक्रमाची भूमिका स्पष्ट करताना बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल म्हणाल्या की, आज महिला आणि युवती शिक्षण, उद्योग, प्रशासन, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत आपल्या कौशल्याच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. देशाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मात्र, कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक मुलगी सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे.

मुलींमध्ये लहान वयापासूनच आत्मविश्वास निर्माण व्हावा, त्यांना स्वतःचे संरक्षण करता यावे आणि त्यांच्या मनात धैर्य व शिस्तीची भावना रुजावी, या उद्देशाने नवरात्रोत्सवाच्या काळात लाठी-काठी प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनी अधिक सक्षम नागरिक म्हणून घडण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उपस्थिती; शिक्षकांचे सहकार्य

या कार्यक्रमाला धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, सातपुडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा जाधव, महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, नगरसेविका डॉ. निशा महाजन, कविता कोळी, योगिता कुटे, नगरसेवक सुभाष जगताप, सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी, अमोल मराठे, मोहित वाघ, धीरज जगताप, कल्पेश थोरात, स्वामी कुटे, सातपुडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एच. वाय. पवार आणि सातपुडा माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पी. बी. चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सातपुडा शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. पंकज पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version