स्मार्ट इलेक्ट्रिक बाइकसह विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रदर्शन; पारोळा-टेहू येथे स्टार्टअप स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली युवा संवाद; प्रदीप पेशकर यांचे स्टार्टअप व स्वयंरोजगार योजनांवर मार्गदर्शन
टिटवी । प्रतिनिधी शिवम माळी
पारोळा-टेहू येथे युवकांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘इनोव्हेटर्स स्टार्टअप स्पर्धा व युवा संवाद’ उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्मार्ट इलेक्ट्रिक बाइक, स्मार्ट पेरणी यंत्र, शेतीमित्र यंत्र आणि बॅटरीवर चालणारी सायकल अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तांत्रिक कौशल्याला या माध्यमातून व्यासपीठ मिळाले.
सुशासन प्रकोष्ठाचे माजी राज्य संयोजक प्रदीप पेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळाच्या आयटीआय तसेच वसंतराव मोरे पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
नोकरीच्या शोधाऐवजी उद्योजकतेचा ध्यास घ्या!
युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे उद्योग उभारावेत आणि त्यातून रोजगारनिर्मिती करावी, हा या युवा संवादामागील प्रमुख उद्देश होता. यावेळी प्रदीप पेशकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून युवकांसाठी उपलब्ध असलेल्या स्टार्टअप, नवउद्योजकता आणि स्वयंरोजगारविषयक विविध योजनांची माहिती दिली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्थानिक समस्या सोडविणाऱ्या कल्पना विकसित कराव्यात आणि त्यांना व्यावसायिक स्वरूप द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प हे तांत्रिक शिक्षणासोबतच प्रत्यक्ष जीवनातील समस्या सोडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी आमदार महेंद्रसिंग बापू, पोपटतात्या भोळे, सुरेंद्रभाऊ बोहरा, गोविंदआबा शिरोळे, नानाभाऊ महाजन, डॉ. अनिल शिंदे, संजय वाघ, राजेंद्र सोनवणे, कन्हैय्या रायपूरकर, अतुल पवार, पराग मोरे, समाधान पाटील, ॲड. कृतिकाताई आफ्रे, रवींद्र पाटील, मुकुंद चौधरी, नानासाहेब पाटील, धीरज महाजन, छोटू पाटील, नरेंद्र पाटील, अमोल शिरोळे, विनोद पाटील, सुदाम चौधरी, बापू महाजन आणि प्राचार्य डी. जी. पाटील यांच्यासह शिक्षकवृंद व विविध पदाधिकारी उपस्थित होते.
नवकल्पनांतून रोजगारनिर्मितीचा संदेश
नवकल्पना, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या बळावर युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, तसेच इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक संधी मिळाल्यास स्थानिक पातळीवरही नावीन्यपूर्ण उद्योग उभे राहू शकतात, हे या उपक्रमाने अधोरेखित केले.
