Spread the love

कुऱ्हा हरदो शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा!

‘एक तास महापुरुषांसाठी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व; भाषणे, प्रश्नमंजुषा आणि पुस्तक वाचनातून ज्ञानाची गोडी

कुऱ्हा हरदो, प्रतिनिधी :

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, महापुरुषांचे विचार आत्मसात व्हावेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. वैशाली संसारे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘एक तास महापुरुषांसाठी’ या उपक्रमांतर्गत भारतरत्न, माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील विज्ञान शिक्षिका कुमुदिनी माहुरे यांच्या हस्ते डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पुस्तकांच्या वाचनातून व्यक्तिमत्त्व विकासाचा संदेश

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात वाचनाची सवय विकसित व्हावी आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना त्यांना त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने पुस्तकांचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांची चरित्रात्मक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून मांडले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी ‘वाचा रे वाचा’ या गीतातून वाचनाचे महत्त्व प्रभावीपणे विशद केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भाषणांमधून त्यांची अभिव्यक्ती, आत्मविश्वास आणि महापुरुषांच्या विचारांविषयीची जिज्ञासा दिसून आली.

भाषणानंतर प्रश्नमंजुषा; विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

विद्यार्थ्यांची आकलनक्षमता वाढविण्यासाठी भाषणांनंतर त्यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ऐकलेल्या आणि वाचलेल्या माहितीचे आकलन तपासण्याची संधी मिळाली. शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पेन, पेन्सिल, शार्पनर आणि खोडरबर यांचा कॉम्बो पॅक बक्षीस म्हणून दिला. या भेटीमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास आणि लेखनासाठी प्रोत्साहन मिळाले.

‘वाचू आनंदे, घडू आनंदे’ उपक्रमातून मार्गदर्शन

डायट, जळगाव यांच्या वतीने आयोजित ‘वाचू आनंदे, घडू आनंदे’ या विशेष संवाद उपक्रमाचे यूट्यूब लाइव्ह प्रक्षेपण विद्यार्थ्यांना सायंकाळी चार वाजता दाखविण्यात आले. या संवादातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नेमके काय वाचावे, कसे वाचावे आणि वाचनाच्या माध्यमातून आनंदी व्यक्तिमत्त्व कसे घडवावे, याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले.

शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे, पुनम वाघोदे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे, कुमुदिनी माहुरे आणि डॉ. वैशाली संसारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार आणि विचारांतून व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, हा संदेश या उपक्रमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version