Spread the love

धुळ्यासह महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर कर गं अंबे!

आदिशक्ती श्री एकवीरामातेला ४०१ फुटांची चुनरी अर्पण; अल्पा अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली श्री खंडेराव मंदिरापासून भव्य पदयात्रा

धुळे, दि. १७ | प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, बळीराजाला दिलासा मिळून सुख-समृद्धी लाभावी आणि राज्यात भरपूर पर्जन्यवृष्टी व्हावी, या प्रार्थनेसह नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खान्देश कुलस्वामिनी आदिशक्ती श्री एकवीरामातेला ४०१ फुटांची चुनरी अर्पण करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली आग्रा रोडवरील श्री खंडेराव महाराज मंदिरापासून श्री एकवीरामाता मंदिरापर्यंत चुनरी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

धुळे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका व्हावी, पिकांना नवसंजीवनी मिळावी आणि रानशिवार हिरवेगार व्हावे, या भावनेतून भाजपच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानासह महिला आघाडीच्या वतीने या धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वाद्यांच्या गजरात चुनरी पदयात्रा

सकाळी साडेआठ वाजता श्री खंडेराव महाराज मंदिरापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. ४०१ फुटांची चुनरी हातात घेऊन महिला पदाधिकारी आणि विद्यार्थिनींनी ‘आई एकवीरामातेचा जयजयकार’ करत मंदिराच्या दिशेने वाटचाल केली. ठिकठिकाणी वाद्यांचा गजर आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. काही चौकांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांनी गरब्याचा फेर धरत उत्साहात सहभाग नोंदवला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींनी पाणी बचतीचे संदेश देणारे फलक हातात घेतले होते. धार्मिक श्रद्धेसोबतच पाण्याचे महत्त्व आणि जलसंवर्धनाचा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.

महिला पदाधिकाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग

या पदयात्रेत अल्पा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस जयश्री अहिरराव, महिला महानगर जिल्हाध्यक्षा सुवर्णा पाटील, बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाच्या धुळे जिल्हा संयोजिका कुंतल अग्रवाल यांच्यासह नगरसेविका कल्याणी अंपळकर, कल्पना महाले, प्रतिभा चौधरी, डॉ. निशा महाजन, प्रभावती शिंदे, योगिता कुटे, वंदना भामरे, वैभवी दुसाने, उज्ज्वला भोसले, संध्या कदम, रूपाली पाटील, शीतल वाघ, पुष्पा पवार, मोहिनी धात्रक, मोहिनी गौड, शीतल बोरसे, सोनल नांद्रे, सोनल बैरागी, काजल नेमाने, मंजुषा नेमाने, पूर्वा अग्रवाल, नीलू अहिरे, सरला अहिरे, पायल अग्रवाल, श्रेया अग्रवाल, खुशी गुप्ता, सारिका अग्रवाल आणि नीतू अग्रवाल सहभागी झाल्या.

यांच्यासह अमोल अग्रवाल, प्रथमेश गांधी, नगरसेवक नागसेन बोरसे, कमलेश देवरे, पवन मराठे तसेच भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते.

शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनींचा सहभाग

चुनरी पदयात्रेत महाराणा प्रताप विद्यालय, परिवर्तन हायस्कूल, अभिजित ठाकरे विद्यालय, एसएनडीटी महिला महाविद्यालय आणि कमलाबाई अजमेरा विद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. डॉ. के. डी. अरगडे, मनोहर चौधरी आणि स्मिता अजमेरा यांच्यासह शिक्षक व शिक्षिकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

चौकट : महाआरती करून दुष्काळ निवारणासाठी प्रार्थना

श्री एकवीरामातेला चुनरी अर्पण; शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी साकडे

पदयात्रा श्री एकवीरादेवी मंदिरात पोहोचल्यानंतर अल्पा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, अन्य महिला पदाधिकारी आणि मंदिराच्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत देवीला ४०१ फुटांची चुनरी अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांनी देवीची महाआरती केली.

यावेळी मंदिरात उपस्थित महिला व पुरुष भाविकांनीही आरतीत सहभागी होत राज्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, वरुणराजाची कृपादृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील रानशिवार हिरवेगार व्हावे, अशी प्रार्थना केली. श्री एकवीरा व रेणुकामाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गुरव आणि मंदिरातील पुजाऱ्यांचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version