डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांची वर्तमानात आवश्यकता!
भालोद महाविद्यालयात २२ ऑक्टोबरला विशेष व्याख्यानाचे आयोजन; प्रा. विलास चव्हाण करणार मार्गदर्शन
संघरत्न सपकाळे | भुसावळ प्रतिनिधी
भालोद, ता. यावल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेच्या अभिप्राय वहीत स्वतःच्या हस्ताक्षरात अभिप्राय नोंदविला होता. या ऐतिहासिक घटनेला २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या सामाजिक व शैक्षणिक विचारांचे वर्तमानातील महत्त्व अधोरेखित करण्यासाठी भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात २२ ऑक्टोबर रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय हा संस्थेसाठी ऐतिहासिक ठेवा असून, ही अक्षरे म्हणजे संस्थेच्या दृष्टीने प्रेरणादायी ‘ऊर्जाक्षरे’ आहेत. या ऐतिहासिक भेटीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या विचारांची ओळख व्हावी आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यातून समाजपरिवर्तनाची प्रेरणा मिळावी, हा या व्याख्यानामागील प्रमुख उद्देश आहे.
प्रा. विलास चव्हाण यांचे मार्गदर्शन
महाविद्यालयाच्या मराठी व राज्यशास्त्र विभागांच्या वतीने आयोजित या विशेष व्याख्यानात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी संचालक आणि आंबेडकरी तत्त्वज्ञान व चळवळीचे अभ्यासक प्रा. विलास चव्हाण (धुळे) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, शिक्षण आणि परिवर्तनविषयक विचार आजच्या काळातही महत्त्वाचे आहेत. या विचारांचा अभ्यास विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना करता यावा, तसेच ऐतिहासिक वारशातून वैचारिक प्रेरणा मिळावी, या उद्देशाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक वारशातून नव्या पिढीला प्रेरणा
२२ ऑक्टोबर १९२९ रोजी झालेल्या बाबासाहेबांच्या भेटीचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नोंदीपुरते मर्यादित नसून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची ही संधी आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा अभ्यास करून समता, सामाजिक न्याय आणि शिक्षणाचे महत्त्व समजून घेण्यास या उपक्रमातून मदत होणार आहे.
या व्याख्यानास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे तसेच सेकंडरी सोसायटी संचालित प्राथमिक शाळा, न्यू इंग्लिश स्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
