बक्षिसांपेक्षा प्रयोग करण्याची हिंमत मोठी; विद्यार्थ्यांची जिज्ञासा थांबता कामा नये!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन; बोरगाव बुद्रुक येथे ५४ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानातील गुणवंत शाळांचा धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरव; विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले नावीन्यपूर्ण प्रयोग
धरणगाव/पाळधी/जळगाव | प्रतिनिधी, दि. १७
“विज्ञान प्रदर्शनात बक्षीस मिळवण्यापेक्षा स्वतःच्या कल्पनेतून नवा प्रयोग करण्याची हिंमत अधिक महत्त्वाची आहे. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी वेगळा गुण दडलेला असतो. शिक्षक आणि पालकांनी तो ओळखून विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांची जिज्ञासा कधीही थांबता कामा नये. आजच्या विद्यार्थ्यांमध्येच उद्याचे सी. व्ही. रमण आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम दडलेले आहेत. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा, त्याचे गुलाम बनू नये. विज्ञानाची कास धरताना संस्कृती आणि संस्कारही जपावेत,” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक येथील सर्वज्ञ माध्यमिक विद्यालयात शिक्षण विभाग, पंचायत समिती धरणगाव आणि संबंधित संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व सेवा संकल्प अभियानाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रयोगशीलतेतूनच वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो!
विज्ञान प्रदर्शन हे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनवृत्तीला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थी शास्त्रज्ञ होईलच असे नाही; मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय आयुष्यभर उपयोगी पडते. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील समस्या ओळखून शेती, पाणीबचत, पर्यावरण आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील असे नवनवीन प्रयोग करावेत. एखादा प्रयोग यशस्वी झाला नाही, तरी खचून न जाता त्यातून शिकत राहावे. प्रयोगशीलतेच्या बळावर जिल्हा आणि राज्यस्तरावर आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिक्षकांचे वेतन वेळेवर अदा करण्याबाबतही त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील विजेत्यांचा गौरव
सन २०२४-२५ मधील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानातील विजेत्या शाळांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धनादेश व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्राथमिक गटातील तालुकास्तरीय विजेते :
-
प्रथम क्रमांक – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाकटुकी : ३ लाख रुपये.
-
द्वितीय क्रमांक – बिलखेडे शाळा : २ लाख रुपये.
-
तृतीय क्रमांक – पिंपरी खुर्द शाळा : १ लाख रुपये.
माध्यमिक गटातील गौरव :
जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या सारजाबाई कुडे माध्यमिक विद्यालयाला ५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या बा. च. भाटिया माध्यमिक विद्यालय, साकरे; द्वितीय क्रमांकाच्या बी. जे. महाजन माध्यमिक विद्यालय, अनोरे; आणि तृतीय क्रमांकाच्या निळकंठेश्वर हायस्कूल, चावलखेडा यांचाही गौरव करण्यात आला.
स्पेलिंग बी स्पर्धेत जिल्हास्तरावर इयत्ता चौथी ते सातवीच्या गटात द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या बांभोरी प्र. चा. येथील कु. राजश्री नन्नवरे हिच्यासह विविध उपक्रमांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सेवा संकल्प अभियानाच्या पुस्तकांचे प्रकाशन; वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे तसेच धरणगावच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले लिखित बालकाव्यसंग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या आवारात मोठ्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी सेवा संकल्प अभियानाचा आढावा सादर केला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले. कृषी क्षेत्रातील समस्या लक्षात घेऊन शेतीसाठी उपयुक्त ठरतील अशी नावीन्यपूर्ण उपकरणे व प्रयोग विकसित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले, तर आभार केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले विज्ञान प्रयोग आणि नावीन्यपूर्ण संकल्पना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरल्या.
विज्ञान प्रदर्शनाचा गटनिहाय निकाल जाहीर
१. प्राथमिक विद्यार्थी गट (इयत्ता सहावी ते आठवी)
-
प्रथम : राजश्री प्रकाश नन्नवरे — जिल्हा परिषद शाळा, बांभोरी प्र. चा.
-
द्वितीय : याशिका धीरज झवर — इम्पेरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी.
-
तृतीय : देवयानी ज्ञानेश्वर पाटील — माध्यमिक विद्यालय, धारशेरी.
-
उत्तेजनार्थ : विराज नरेंद्र महाजन — स. न. झवर विद्यालय, पाळधी.
२. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी गट (इयत्ता नववी ते बारावी)
-
प्रथम : मोहित मनोज मराठे व मोहित आबा मराठे — सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव.
-
द्वितीय : गायत्री भरत पवार व कीर्ती योगेश पाटील — मा. गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, पाळधी.
-
तृतीय : वरद विशाल करवाह — सारजाई दामोदर कुडे विद्यालय, धरणगाव.
-
उत्तेजनार्थ : दुर्वाशी चंद्रशेखर देशमुख — इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, धरणगाव.
३. प्राथमिक शिक्षक गट
-
प्रथम : दिनेश प्रल्हाद चौधरी — लिलाबाई स्कूल, पथराड.
-
द्वितीय : मोसिन खान अजीज खान — जिल्हा परिषद उर्दू शाळा, फुलेनगर.
४. माध्यमिक शिक्षक गट
-
प्रथम : पवन शिवाजी भदाणे — आश्रमशाळा, बोरगाव.
-
द्वितीय : मिलिंद बापूराव पाटील — अंजनी ग्रुप, हिंगोणे.
५. प्रयोगशाळा सहायक गट
-
प्रथम : भाग्यश्री मनोहर नेमाडे — नांदेड स्कूल, नांदेड.
-
द्वितीय : धनंजय प्रकाश शेवाळे — सर्वज्ञ माध्यमिक विद्यालय, बोरगाव.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी सागर कोल्हे, संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, बोरगाव खुर्दच्या सरपंच अर्चना पाटील, बोरगाव बुद्रुकच्या सरपंच उषाबाई मराठे, बालकवी ठोंबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक जीवन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, राजेंद्र सैंदाणे यांच्यासह तालुक्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी, संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
