Spread the love

भुसावळात शारदीय नवरात्रोत्सवाचा उत्साह; महाकाली मंदिरात ५०१ दीपप्रज्वलन अन् १११ घटस्थापना!

१५ ते १६ वर्षांची परंपरा अखंड सुरू; मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती, भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन

भुसावळ | प्रतिनिधी : प्रमोद पाटील

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील खेडी रस्त्यालगत असलेल्या श्रद्धास्थान श्री महाकाली देवी मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात ५०१ दीप प्रज्वलित करण्यात आले असून, १११ घटस्थापनाही करण्यात आल्या आहेत. गेल्या १५ ते १६ वर्षांपासून हा नवरात्रोत्सव अखंडितपणे साजरा केला जात असल्याने परिसरातील भाविकांसाठी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

भुसावळ परिसरातील सर्व भाविकांना सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, धनसंपदा आणि ऐश्वर्य लाभावे, तसेच महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लवकर दूर होऊन शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, अशी प्रार्थना या धार्मिक सोहळ्यानिमित्त करण्यात येत आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य महाआरती

नवरात्रोत्सवानिमित्त श्री महाकाली देवी मंदिरात सायंकाळी आणि रात्रीच्या सत्रात विशेष महाआरती पार पडली. या महाआरतीचा मान महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे, महामंडलेश्वर श्री. जनार्दन महाराज, उद्योजक तथा माजी नगरसेवक श्री. मनोजभाऊ बियाणी, डॉ. केतकीताई पाटील आणि महामंडलेश्वर श्री. गेंदानाथ महाराज यांच्यासह विविध ठिकाणांहून आलेल्या संत-महात्म्यांना मिळाला.

यावेळी भुसावळ शहर व परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दीपप्रज्वलन, घटस्थापना आणि महाआरतीमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

देवीच्या दर्शनासाठी भाविकांना आवाहन

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री महाकाली देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आणि उत्साह लक्षवेधी ठरत आहे. भाविकांनी मंदिरात येऊन देवीचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडलेश्वर श्री. गेंदानाथ महाराज आणि मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version