पवित्र पोर्टल शिक्षक भरती: ‘एक पद एक बिंदू’ अटीमुळे गुणवंत उमेदवारांवर अन्याय
उच्च पात्रता असूनही प्राथमिक पदांवर समाधान मानण्याची वेळ
विशेष प्रतिनिधी : नागपूर
राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील त्रुटींमुळे गुणवंत उमेदवारांचे मोठे नुकसान होत असून, त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना डी.एड. आणि सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांमधून व्यक्त होत आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता ११ वी आणि १२ वी ची उच्च माध्यमिक पदे न आल्यामुळे आणि भरती प्रक्रियेतील ‘एक पद एक बिंदू’ या जाचक अटीमुळे जास्त गुण मिळवूनही अनेक उमेदवारांना इयत्ता ६ ते ८ ऐवजी केवळ १ ते ५ च्या प्राथमिक शिक्षक पदांवर समाधान मानावे लागत आहे.
काय आहे नेमकी समस्या?
पवित्र पोर्टल अंतर्गत १ ते १२ वी च्या शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात उच्च माध्यमिक (११ वी व १२ वी) वर्गातील शिक्षकांची रिक्त पदे पूर्णपणे प्रकाशित करण्यात आली नाहीत. यामुळे टीएआयटी (TAIT) परीक्षेत उच्च गुण मिळवलेले आणि सीटीईटीचे दोन्ही पेपर (पेपर १ व २) उत्तीर्ण असलेले हजारो उमेदवार ६ ते १० वी च्या वर्गांच्या शर्यतीत राहिले. परिणामी, ६ ते १० वीच्या जागा मर्यादित राहिल्याने या वर्गांचा कट-ऑफ प्रचंड वाढला.
दुसरीकडे, ‘एक पद एक बिंदू’ या नियमामुळे उमेदवाराची एका पदावर निवड झाल्यास त्याचा इतर सर्व जागांवरील हक्क संपतो. यामुळे नोकरीच्या सुरक्षेसाठी जास्त गुण असणाऱ्या गुणवंत उमेदवारांना नाईलाजाने प्राथमिक वर्गांचे (१ ते ५ वी) पसंतीक्रम लॉक करावे लागले. जर पहिल्याच टप्प्यात ११ वी आणि १२ वी ची पदे आली असती, तर अधिक गुणांचे उमेदवार तिकडे नियुक्त झाले असते आणि ६ ते ८ वी च्या पदांवर डी.एड./बी.एड. व सीटीईटी पात्र उमेदवारांची सहज निवड झाली असती, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेप्रमाणे ‘बेटरमेंट’चा पर्याय द्या!
“आम्ही पात्र असूनही केवळ शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आम्हाला खालच्या पदांवर काम करावे लागत आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (उदा. इंजिनिअरिंग, मेडिकल) धर्तीवर पवित्र पोर्टलवरही उमेदवारांना ‘फ्लोट’ किंवा ‘बेटरमेंट’ चा पर्याय दिला गेला पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या टप्प्यात वरच्या वर्गांच्या जागा आल्यास गुणवंतांना तिथे अपग्रेड होण्याची संधी मिळेल,” अशी मागणी बाधित उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात उमेदवारांनी शिक्षण आयुक्त आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे इमेल आणि निवेदनाद्वारे दाद मागितली असून, हा नियम शिथिल न केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागायला जाणार असा इशारा दिला आहे.
“पवित्र पोर्टलवरील ‘एक पद एक बिंदू’ ही अट गुणवंत उमेदवारांचे खच्चीकरण करणारी ठरत आहे. टप्प्याटप्प्याने जाहिराती काढल्यामुळे कमी गुण असणारे उमेदवार भविष्यात वरच्या वर्गावर लागतील आणि आम्ही जास्त गुण घेऊनही केवळ १ ते ५ च्या वर्गावर अडकून पडू. ही तफावत दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने या जाचक अटीमध्ये त्वरित शिथिलता आणली पाहिजे, अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील.”
