Spread the love

जिजाऊ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयुध पूजन सोहळा उत्साहात संपन्न!

कौशल्याधारित शिक्षण, मेहनत आणि शिस्तीचा संदेश; प्रशिक्षणार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

परभणी | प्रतिनिधी : रामचंद्र अन्नदाते

पाथरी रोड येथील जिजाऊ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पारंपरिक उत्साहात आयुध पूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. रामराव दादा लोहट होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर तरवटे उपस्थित होते. यावेळी संस्थेतील प्रशिक्षणार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कौशल्याधारित शिक्षणातून भविष्य घडवा!

अध्यक्षीय मनोगतात रामराव दादा लोहट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष कामातील कौशल्ये आत्मसात करावीत. मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांच्या जोरावर स्वतःचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.

औद्योगिक क्षेत्रात सुरक्षितता आणि अचूकतेला महत्त्व

प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांनी आयुध पूजनाचे महत्त्व स्पष्ट करताना औद्योगिक क्षेत्रात तांत्रिक ज्ञानासोबतच सुरक्षितता, अचूकता आणि कामाप्रती निष्ठा या गुणांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणादरम्यान या गुणांचा अंगीकार करून भविष्यात कुशल आणि जबाबदार तंत्रज्ञ बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले.

गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

याप्रसंगी संस्थेचे गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आपल्या अनुभवपूर्ण विचारांतून त्यांनी मेहनत, आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.

शिक्षक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले, तर कुलथे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चव्हाण सर, स्वामी सर, रेंगे सर, रसाळ सर, प्रवीण सर आणि सपना मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version