Spread the love

दसऱ्याला सोने खरेदीचा उत्साह मंदावला; दुष्काळाचा सराफा बाजाराला फटका!

मागील वर्षाच्या तुलनेत सोने खरेदीत ३० टक्के घट; सोन्या-चांदीच्या दरातही घसरण, ग्राहकांचा तुरळक प्रतिसाद

धुळे | प्रतिनिधी

दसरा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असतानाही यंदा धुळे शहरातील सराफा बाजारात ग्राहकांचा तुरळक प्रतिसाद पाहायला मिळाला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सोने खरेदीत सुमारे ३० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती नाशिककर ज्वेलर्सचे संचालक अजय नाशिककर यांनी दिली. जिल्ह्यासह राज्यावर असलेले दुष्काळाचे सावट आणि बाजारातील मंदीचा परिणाम सराफा व्यवसायावर झाल्याचे चित्र आहे.

सोन्याच्या दरात घसरण, तरीही खरेदीला मर्यादित प्रतिसाद

सध्या सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ४६ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर प्रति किलो २ लाख ११ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली. सोन्या-चांदीच्या दरात घट झाली असली, तरी ग्राहकांकडून अपेक्षित खरेदी झालेली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चावर मर्यादा आल्या असून, त्याचा परिणाम सणासुदीच्या खरेदीवरही दिसून येत आहे.

दुष्काळ आणि बाजारातील मंदीचा परिणाम

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. या दिवशी नवीन दागिने खरेदी करण्यासाठी सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असते. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि बाजारातील मंदीमुळे ग्राहकांनी खरेदीबाबत हात आखडता घेतल्याचे दिसून आले.

दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सराफा बाजारात होणारी गर्दी यंदा कमी झाली. त्यामुळे सराफा व्यावसायिकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले असून, व्यापाऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

आधी निवडलेले दागिने खरेदीसाठी ग्राहकांची उपस्थिती

पितृपक्षाच्या काळात सोन्याचे दागिने पसंत करून ठेवलेल्या काही ग्राहकांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दुकानात येऊन खरेदी केली. मात्र, अशा ग्राहकांव्यतिरिक्त नव्याने खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शुभमुहूर्त असूनही बाजारात अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचे चित्र दिसून आले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version