Spread the love

भुसावळात स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेदन; प्रलंबित मागण्यांसाठी संघटना आक्रमक!

दर्जेदार धान्य, वेळेत पुरवठा आणि ई-पॉस मशीनमध्ये त्वरित डाटा उपलब्ध करून देण्याची मागणी; लाभार्थ्यांची संख्या पूर्ववत करण्यावरही भर

भुसावळ | प्रमोद पाटील प्रतिनिधी

भुसावळ : स्वस्त धान्य दुकानदारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यात यावी, या मागणीसाठी भुसावळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. धान्याचा दर्जा, वजनातील प्रमाण, वेळेत पुरवठा, ई-पॉस मशीनमधील डाटा आणि कमी झालेल्या लाभार्थ्यांची संख्या या प्रमुख मुद्द्यांवर संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले.

स्वच्छ आणि दर्जेदार धान्य देण्याची मागणी

जळगाव तसेच भुसावळ येथील गोदामांतून स्वस्त धान्य दुकानांपर्यंत पोहोचणारे गहू, तांदूळ आणि इतर धान्य स्वच्छ व चांगल्या दर्जाचे असावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. लाभार्थ्यांना योग्य दर्जाचे धान्य मिळावे, यासाठी संबंधित यंत्रणेने आवश्यक दक्षता घ्यावी, असे संघटनेने नमूद केले.

दरमहा २० तारखेच्या आत धान्य पोहोचावे

स्वस्त धान्य दुकानदारांना दरमहा धान्यपुरवठा वेळेत होत नसल्याने वितरण प्रक्रियेत अडचणी निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या २० तारखेच्या आत दुकानांमध्ये धान्य पोहोचविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच धान्याचे वजन निर्धारित ५०.५०० या प्रमाणानुसारच देण्यात यावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

ई-पॉस मशीनमध्ये तातडीने डाटा उपलब्ध करावा

धान्य दुकानात पोहोचल्यानंतर ई-पॉस (POS) मशीनमध्ये संबंधित डाटा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली. डाटा उपलब्ध होण्यास विलंब झाल्यास धान्य वितरण प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून दुकानदारांना वेळेत वितरण करता यावे, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

कमी झालेले लाभार्थी पूर्ववत करण्याची मागणी

‘सुधार मिशन’अंतर्गत ज्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, त्या लाभार्थ्यांची नावे पुन्हा संबंधित दुकानांमध्ये समाविष्ट करण्यात यावीत, अशी मागणीही करण्यात आली. लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे दुकानदारांच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे संघटनेने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

निवेदन सादर करताना भुसावळ तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे, शहर अध्यक्ष आरीफ मिर्झा, महिला शहर अध्यक्ष टीना धांडे, जिल्हा सचिव सुनील अंभोरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कैलास उपाध्याय, तालुका उपाध्यक्ष सी. आर. पाटील व विजय मेढे, कार्याध्यक्ष पंकज पाटील, तालुका सचिव उल्हास भारसके, संघटक ईश्वर पवार, शहर सचिव यशवंत बनसोडे, शहर उपाध्यक्ष राजेश सैनी, विभागीय अध्यक्ष संतोष माळी, शहर प्रसिद्धी प्रमुख उमाकांत शर्मा, तालुका प्रसिद्धी प्रमुख संघरत्न सपकाळे आणि शहर संघटक संतोष साळवे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वस्त धान्य दुकानदारांच्या या मागण्यांवर प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version