आधुनिक भारताच्या निर्मितीचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
प्रा. डॉ. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन; भालोद न्यू इंग्लिश स्कूलमधील ऐतिहासिक भेटीला ९७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘पाऊलखुणा प्रबोधनाच्या’ कार्यक्रम
संघरत्न सपकाळे | भुसावळ
भालोद : शिक्षण हे व्यक्ती, समाज आणि देशाच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांना शिक्षण, समानता आणि हक्कांची दिशा देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या निर्मितीचे खरे शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानवतावादी विचारवंत आणि आंबेडकरी साहित्य, तत्त्वज्ञान व चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. विलास चव्हाण यांनी केले.
भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेच्या पाहणीसाठी नियुक्त समितीचे शासकीय सदस्य म्हणून भेट दिली होती. या ऐतिहासिक भेटीला २२ ऑक्टोबर रोजी ९७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी आणि राज्यशास्त्र विभागांच्या वतीने ‘पाऊलखुणा प्रबोधनाच्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विलास चव्हाण बोलत होते.
शिक्षणातूनच व्यक्ती आणि समाजाचा विकास
व्यक्तीला शिक्षणाची संधी मिळाली नाही, तर तिच्यातील कौशल्यांचा विकास खुंटतो. परिणामी तिच्या आचार-विचारांवर आणि व्यक्तिमत्त्वावरही परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे प्रा. डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. वंचित, शोषित आणि उपेक्षित समाजघटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, त्यांना प्रगतीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि समाजात समानतेची मूल्ये रुजावीत, यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आजही देशाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक प्रगतीसाठी मार्गदर्शक आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा बाबासाहेबांकडून घ्यावी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले प्राचार्य डॉ. के. जी. कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खडतर शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला. मनोबल मजबूत असेल, तर कठीण परिस्थितीवरही मात करता येते, हा संदेश बाबासाहेबांच्या जीवनातून मिळतो. ज्ञानाची अखंड आस आणि प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणासाठी केलेला संघर्ष यांमुळे डॉ. आंबेडकर हे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक भेटीचा अनमोल ठेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या भालोद न्यू इंग्लिश स्कूलविषयी त्यांनी नोंदविलेला अभिप्राय संस्थेने जतन करून ठेवला आहे. हा अभिप्राय संस्थेसाठी ऐतिहासिक आणि अनमोल ठेवा असून, त्यातून संस्थेच्या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित होते.
या कार्यक्रमाला सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायण चौधरी, संचालक अरुण चौधरी, संचालक शरद परतणे, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. जतीन मेढे, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे आदी उपस्थित होते.
संस्थेचे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह भुसावळ प्रागतिक विचार मंचाचे जे. पी. सपकाळे सर, प्रा. बच्छाव सर आणि पत्रकार संघरत्न सपकाळे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जतीन मेढे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिनेश पाटील यांनी केले.
