Spread the love

दुष्काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे! — पालकमंत्री गुलाबराव पाटील

वाकटुकी येथे ७८ लाखांच्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे भूमिपूजन; जळगाव व धरणगाव तालुक्यांतील नऊ बंधाऱ्यांसाठी १० कोटी २४ लाखांचा निधी मंजूर

धरणगाव/पाळधी/जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी) : शेतकरी जेव्हा संकटात सापडतो, तेव्हा शासन त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. सध्या दुष्काळी परिस्थिती असली, तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन बंधारे उभारून पाणीसाठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे; मात्र पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. शासनाचे प्रयत्न आणि जनतेची साथ यांच्या बळावर दुष्काळावर मात करता येईल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या वाकटुकी येथील ७८ लाख रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट बंधाऱ्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्यास आणि सिंचनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

नऊ बंधाऱ्यांसाठी १० कोटी २४ लाखांचा निधी

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून मागील वर्षी जळगाव व धरणगाव तालुक्यांतील नऊ बंधाऱ्यांसाठी सुमारे १० कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, भूजलपातळी वाढविणे आणि सिंचनक्षेत्राचा विस्तार करणे शक्य होणार आहे.

झिरी नदी परिसरात यापूर्वी उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा सिंचनासाठी मोठा फायदा झाला आहे. त्याच धर्तीवर वाकटुकी परिसरातील बंधाऱ्यांमुळेही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

ग्रामस्थांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना लोकचळवळ म्हणून पुढे न्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

गावांना जोडणारे रस्ते आणि शेतरस्त्यांना प्राधान्य

परिसरातील विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री म्हणाले की, गावांना जोडणारे रस्ते, गावांतर्गत रस्ते आणि शेतरस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गिरणा धरणातून वेळोवेळी पाण्याची आवर्तने सोडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गिरणा धरणातून आणखी एक आवर्तन मिळावे, यासाठी प्रयत्न केले जातील. मात्र, हे आवर्तन निश्चितपणे मिळेल, अशी शंभर टक्के खात्री देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाकटुकी येथील आदर्श शाळेचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, वाकटुकी हे टेल एंडचे गाव असले, तरी विकासाच्या दृष्टीने या गावाने हेड एंडचे गाव व्हावे, हा आपला प्रयत्न आहे.

जळगाव ग्रामीणच्या विकासाबाबत विश्वास

यावेळी भाजप नेते भगवान महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचा बारामतीच्या धर्तीवर विकास होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांनी केले होते.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील, भाजप विधानसभा क्षेत्रप्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, माजी जिल्हा परिषद सभापती पी. सी. आबा पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ॲड. शरद माळी, भाजप तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख रोहित कोगटा, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन पाटील, धरणगाव शहरप्रमुख धीरेंद्रआप्पा पुरभे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाटेश्वर पाटील, वैद्यकीय आघाडी तालुका संघटक अजय बाबा पाटील, मागासवर्गीय सेना जिल्हाप्रमुख मुकुंद नन्नवरे, पंचायत समिती सदस्य अनिल पाटील, चांदसरचे सरपंच सचिन पवार, खामखेड्याचे सरपंच धीरज पाटील, पोलीस पाटील गुलाब सोनावणे, उपसरपंच मनोहर कोळी, ज्येष्ठ शिवसैनिक रतन जिभू कोळी आणि शाखाप्रमुख पांडुरंग रघुनाथ कोळी उपस्थित होते.

याशिवाय गजानन पाटील, रवींद्र पाटील, संजय पाटील सर, कैलास सोनावणे, दीपक भदाणे, शंकर सावंत, शाहरुख पटेल, रोहित पाटील, मंगेश पाटील, वाल्मिक पाटील, सुजन चव्हाण, जितेंद्र पाटील, किशोर पाटील, रणजित पाटील, मंगलअण्णा पाटील, बाळूभाऊ जाधव, शुभम चव्हाण, सुनील महाराज, नितीन पाटील, लक्ष्मण बापू कोळी, वासुदेव भिका कोळी, आत्माराम उखरडू कोळी, ज्ञानेश्वर आत्माराम कोळी, गणेश काशिनाथ पाटील, चेतन देविदास पाटील आणि सागर कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ तसेच शिवसेना-भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version