Spread the love

न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात; भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा उत्साहात समारोप!

पॉक्सो कायदा, सायबर सुरक्षा, बालविवाह व बालकामगार प्रतिबंधाबाबत शाळांमध्ये जनजागृती; विद्यार्थ्यांना निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहन

भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ

बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण व्हावे, तसेच त्यांना आपल्या वैधानिक हक्कांची जाणीव व्हावी, या उद्देशाने भडगाव तालुका विधी सेवा समिती आणि भडगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘सुरक्षित बचपन अभियान’ या कायदेविषयक जनजागृती सप्ताहाचा उत्साहात समारोप झाला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तसेच मे. दिवाणी व फौजदारी न्यायालय (कनिष्ठ स्तर), भडगाव यांच्या आदेशान्वये २६ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात आली.

शाळांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शनाची विशेष सत्रे

अभियानांतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक अभिजीत दायमा यांच्यासह ॲड. घनश्याम मोरे, ॲड. समाधान सोनवणे, ॲड. हेमंत कुलकर्णी, ॲड. निलेश तिवारी, ॲड. पी. जी. सोनवणे, डॉ. सुवर्णा पाटील, ॲड. आर. के. वाणी, ॲड. गणेश वेलसे, ॲड. ए. डी. बाग, ॲड. रोहित मिसर आणि ॲड. लोकेश म्हसकी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा पॉक्सो कायदा २०१२, सायबर सुरक्षा, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालकामगार प्रतिबंधक कायदे यांची सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा शोषण झाल्यास घाबरून न जाता आवाज उठवावा आणि कायदेशीर मदत घ्यावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. ‘बोलो, बताओ, बचाओ’ या संदेशातून विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपली बाजू मांडण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात मार्गदर्शन

सौ. सुमनताई गिरधर पाटील विद्यालयात आयोजित सत्राच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका छाया बिर्‍हाडे होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक तायडे सर, सोनजे सर आणि देवेंद्र पाटील सर यांनी केले.

लाडकुबाई विद्या मंदिरातही जनजागृती

लाडकुबाई विद्या मंदिरातील सत्राच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली पाटील उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्याध्यापिका सीमा सैंदाणे, आहेर सर आणि सपना देवरे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवल जोशी यांनी केले. सप्ताहाच्या समारोपप्रसंगी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक अभिजीत दायमा यांनी आभार प्रदर्शन केले.

न्यायालयीन कर्मचारी आणि शिक्षकांचे सहकार्य

या देशव्यापी मोहिमेच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी अयाज मुल्ला, विवेक गर्गे आणि सुगी पाटील यांनी परिश्रम घेतले. लाडकुबाई विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.

संपूर्ण सप्ताहाचे नियोजन आणि मार्गदर्शन तालुका विधी सेवा समितीचे समांतर विधी सहाय्यक दीपक मोतीराम मराठे, विठ्ठल कौतिक पाटील, विजय देशपांडे, डॉ. ईश्वर परदेशी आणि मयुरी पाटील यांनी केले.

न्यायालयाचा उपक्रम शाळेच्या दारात

न्यायालयीन यंत्रणेने केवळ न्यायालयाच्या चार भिंतींपुरते मर्यादित न राहता थेट शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली. बालकांचे हक्क, सुरक्षितता आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य याबाबत जागृती करणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षण, विधी आणि सामाजिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version