Spread the love

जुनी पेन्शन बंदीच्या निषेधार्थ ३१ ऑक्टोबरला ‘काळा दिवस’!

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आंदोलन; पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नोंदविला निषेध

भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने ३१ ऑक्टोबर हा दिवस राज्यभर ‘काळा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. ३१ ऑक्टोबर २००५ रोजी राज्य शासनाने जुन्या पेन्शन योजनेऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ दरवर्षी हा दिवस पाळण्यात येतो. संघटनेच्या आवाहनानुसार राज्यातील २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.

जुनी पेन्शनसाठी संघर्ष सुरूच

याबाबत माहिती देताना संघटनेचे आरोग्य विभागाचे राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी विविध आंदोलने आणि पाठपुरावा करीत आहे.

संघटनेच्या आंदोलनांमुळे शासनाने मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन लागू केली आहे. तसेच ग्रॅच्युइटी आणि रजा रोखीकरणाचे लाभही मिळाले आहेत. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होईपर्यंत संघटनेचा संघर्ष संविधानिक मार्गाने अविरत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

म्हातारपणाचा आधार असलेली जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी

जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या सुरक्षित जीवनाचा आधार आहे. त्यामुळे शासनाने कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी संजय सोनार कळवाडीकर यांनी केली.

दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड येथील सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नियमित कामकाज करत जुनी पेन्शन बंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version