Spread the love

‘युवारंग २०२६’मध्ये मुळजी जेठा महाविद्यालयाचे सर्वसाधारण विजेतेपद!

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय उपविजेते; माजी विद्यार्थी हेमंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

जळगाव | शिवम माळी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘युवारंग २०२६’ आणि दिव्यांग महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. तर महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांनी सर्वसाधारण उपविजेतेपद मिळविले.

विविध कलागुणांच्या सादरीकरणाने महोत्सवात रंगत

महोत्सवादरम्यान विविध कला आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नृत्य, गायन, नाट्य आणि इतर सांस्कृतिक कलाप्रकारांत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धांमधील चुरस आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण महोत्सवात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.

समारोपप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या महाविद्यालयांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

माजी विद्यार्थ्याच्या हस्ते पारितोषिक वितरण; महोत्सवाचे विशेष आकर्षण

यंदाच्या ‘युवारंग २०२६’ महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे युवारंगाचा माजी विद्यार्थी हेमंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. एकेकाळी याच व्यासपीठावर विद्यार्थी म्हणून सहभागी झालेल्या माजी विद्यार्थ्याच्या हस्ते आज विजेत्यांना पारितोषिके प्रदान होणे, ही महोत्सवासाठी अभिमानाची बाब ठरली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणारा आणि सांस्कृतिक प्रतिभेला प्रोत्साहन देणारा ‘युवारंग २०२६’ महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version