Spread the love

पहूरमध्ये शेततळ्यात बुडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

सकाळी सहाच्या सुमारास घटना उघडकीस; नागरिकांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश, परिसरात हळहळ

पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी

पहूर येथे शेततळ्यातील पाण्यात बुडून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. १ नोव्हेंबर २०२६) सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. अमृत त्र्यंबक वानखेडे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पहूर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृत त्र्यंबक वानखेडे हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. यावेळी शेतातील शेततळ्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी सहाच्या सुमारास ही बाब निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दातरे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

शेततळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढणे आव्हानात्मक ठरले. नागरिकांनी दोराच्या साहाय्याने अथक प्रयत्न केले. अखेर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अमृत वानखेडे यांचा मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी मृतदेह पहूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

पहूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पाटील यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास राहुल पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version