Spread the love

कुऱ्हा हरदो येथे सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांना अभिवादन!

‘एक तास महापुरुषांसाठी’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय एकता दिन व पुण्यतिथी साजरी; विद्यार्थ्यांची भाषणे आणि प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्त सहभाग

कुऱ्हा हरदो | प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कुऱ्हा हरदो येथे डॉ. वैशाली संसारे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘एक तास महापुरुषांसाठी’ या उपक्रमांतर्गत ३१ ऑक्टोबर रोजी भारताचे माजी उपपंतप्रधान, भारतरत्न आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून, तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेतील शिक्षिका पुनम वाघोदे आणि छाया बहुरूपे यांच्या हस्ते दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा

डॉ. वैशाली संसारे यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. सरदार पटेल यांचे बारडोली सत्याग्रहातील नेतृत्व आणि स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचे विलीनीकरण करून भारताला एकसंघ राष्ट्र बनविण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

यावेळी राष्ट्रीय एकात्मता, देशाची अखंडता आणि सामाजिक बंधुभाव जपण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आले.

विद्यार्थ्यांची भाषणे; प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्त सहभाग

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर उत्कृष्ट भाषणे सादर केली. लावण्या सोनवणे, भाग्यश्री सुरळकर, आशिष कांडेलकर, चंदन माळी आणि पायल इंगळे यांनी भाषणांमधून आपले विचार मांडले. त्यानंतर भाषणांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.

शिक्षकांचे मार्गदर्शन व सहकार्य

या उपक्रमाला शेलवड केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रतिमा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रेडेड मुख्याध्यापक गजानन कोठाळे, पुनम वाघोदे, योगेश बोरोले, छाया बहुरूपे, नितीन लांडे, कुमुदिनी माहुरे आणि डॉ. वैशाली संसारे यांनी मोलाचे सहकार्य केले.

महापुरुषांच्या जीवनकार्याची ओळख करून देतानाच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम शाळेत उत्साहात पार पडला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version