दिवाळीत रेल्वे प्रवाशांना दिलासा! मुंबई–नागपूर विशेष एक्स्प्रेस धावणार; हटिया ट्रेनलाही मुदतवाढ
लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूरदरम्यान आठ विशेष फेऱ्या; जळगाव, भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे
संघरत्न सपकाळे | भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ : दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. सणासुदीच्या काळातील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा तसेच काही विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूरदरम्यान आठ विशेष फेऱ्या चालविण्यात येणार असून, लोकमान्य टिळक टर्मिनस–हटिया विशेष रेल्वेच्या सेवेलाही मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे जळगाव, भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगाव, भुसावळसह अनेक स्थानकांवर थांबे
लोकमान्य टिळक टर्मिनस–नागपूर विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेसला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईहून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा लाभ घेता येणार आहे.
मुंबई–नागपूर विशेष एक्स्प्रेसच्या आठ फेऱ्या
गाडी क्रमांक ०१०८९ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ९.४५ वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०९० नागपूर येथून ६ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी आणि सोमवारी सायंकाळी ४.१० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
ऑनलाइन आरक्षणाची सुविधा उपलब्ध
या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांसह आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे सामान्य दराने काढता येणार आहेत. तसेच रेलवन ॲपवरूनही तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि इतर माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा एनटीईएस ॲपला भेट द्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबई, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भादरम्यान प्रवास करणाऱ्यांना सोयीचे ठरणार आहे.
