वाडी-शेवाडे प्रकल्पाचे आंदोलन तात्पुरते स्थगित; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांच्या संघर्षाला तूर्तास ब्रेक!
जलसमाधी घेण्याच्या प्रयत्नानंतर प्रशासनाची मध्यस्थी; महिनाभरात पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन
शिंदखेडा | प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यातील वाडी-शेवाडे मध्यम प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार, कालव्यांच्या कामातील अनियमितता, भूसंपादनाचे प्रलंबित प्रश्न आणि अन्य अकरा मागण्यांसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नसून, तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनांची महिनाभरात पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
जलसमाधीच्या प्रयत्नानंतर प्रशासनाची धावपळ
वाडी-शेवाडे मध्यम प्रकल्पाच्या डावा आणि उजवा कालव्याच्या कामातील कथित अनियमितता, भूसंपादनाचा मोबदला आणि इतर प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी धरणात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत पुढील चर्चा केली.
महिनाभरात पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक
प्रशासनाकडून शेतकऱ्यांना लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानुसार एका महिन्याच्या आत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रकल्पाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले. या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पुन्हा आंदोलन
प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनाला तूर्तास विराम मिळाला असला, तरी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. महिनाभरात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
बाईट :
-
बबलू माळी – उपोषणकर्ते
-
ईश्वर पढार – अधीक्षक अभियंता, सिंचन विभाग
