मॅसॉनिक लॉज मिळकत प्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा!
सह जिल्हा निबंधकांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा केदारनाथ सानप यांचा आरोप; १६ नोव्हेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण
भुसावळ | प्रमोद पाटील, प्रतिनिधी
भुसावळ येथील गट क्रमांक १०० मधील मिळकतींसह मॅसॉनिक लॉजच्या इतर मिळकतींच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कथित कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या अनधिकृत व बेकायदेशीर व्यवहारांपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, अशी तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी चौकशी करून संबंधित मिळकतींबाबत आदेश दिल्याचे सांगण्यात येते.
मिळकतींचे व्यवहार रोखण्याचे आदेश
सानप यांच्या तक्रारीनंतर सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर भुसावळ तहसीलदारांनी संबंधित मिळकतींचे अभिलेख तपासून शर्तभंग झाल्याचे आढळल्यास पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश दिले होते.
तसेच तहसीलदारांकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत वादग्रस्त मिळकत आणि मॅसॉनिक लॉजच्या इतर मिळकतींचे व्यवहार होऊ नयेत, यासाठी संबंधित मिळकती प्रतिबंधित करण्याचे आदेश देण्यात आल्याचा दावा सानप यांनी केला आहे.
आदेशाची अंमलबजावणी न झाल्याचा आरोप
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही भुसावळ तहसीलदारांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असा आरोप केदारनाथ सानप यांनी केला आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने त्यांनी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
१६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण
या प्रकरणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केदारनाथ सानप यांनी १६ नोव्हेंबर २०२६ पासून भुसावळ उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील लेखी पत्र त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन सादर केले आहे. तसेच माहितीस्तव जिल्हाधिकारी आणि जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनाही पत्राच्या प्रती देण्यात आल्या आहेत.
आता या प्रकरणात तहसील प्रशासन कोणती भूमिका घेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
