Spread the love

मोहित तांबे यांचा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश; पारोळा युवासेना शहरप्रमुखपदी नियुक्ती

आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; विविध भागांतील युवकांचाही पक्षप्रवेश

पारोळा | प्रतिनिधी – संदीप पाटील

पारोळा शहरातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा श्री भवानी गड संस्थानचे अध्यक्ष मोहित तांबे यांनी एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपल्या युवा समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात मोहित तांबे यांच्यावर पारोळा युवासेना शहरप्रमुखपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली.

पारोळा येथील पंकज बँक्वेट हॉलमध्ये आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांनी मोहित तांबे यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पारोळा शहरातील शिवसेना आणि युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सामाजिक कार्याची दखल घेत महत्त्वाची जबाबदारी

मोहित तांबे हे पारोळा शहरातील सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी युवकांचे संघटन उभे केले आहे. आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

या सोहळ्यात महादेव चौक, मडक्या मारोती चौक, साईबाबा नगर यांसह शहरातील विविध भागांतील युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांच्या हस्ते मोहित तांबे आणि त्यांच्या युवा सहकाऱ्यांचा सत्कार करून शिवबंधन बांधण्यात आले.

सुधाकरअण्णा पाटील यांना श्रद्धांजली

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अॅड. अमोलदादा पाटील यांनी शेतकी संघाचे संचालक सुधाकरअण्णा पाटील यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी दिवंगत सुधाकरअण्णा पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version