Spread the love

दुष्काळी परिस्थितीत वीजबिल वसुलीची सक्ती करू नका!

थकीत बिलांमुळे वीजजोडणी तोडू नये; टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सुविधा देण्याची पहूर येथील महावितरणकडे मागणी

पहूर, ता. जामनेर | प्रतिनिधी

पहूर परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि शेतमजूर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी सक्ती करू नये, तसेच थकीत वीजबिलाच्या कारणावरून ग्राहकांचे वीजजोडणी खंडित करू नये, अशा विविध मागण्यांचे निवेदन महावितरणच्या पहूर कार्यालयात देण्यात आले.

एकरकमी बिल भरण्याची सक्ती नको

दुष्काळी परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती अडचणीची झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकरकमी वीजबिल भरण्याची सक्ती न करता टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच थकीत वीजबिलाच्या कारणावरून वीजजोडणी तोडण्याची कारवाई करू नये, अशीही मागणी करण्यात आली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन

या मागण्यांचे निवेदन महावितरणचे उपअभियंता परदेशी आणि सहाय्यक अभियंता बोदलकर यांना सादर करण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा मिळावा आणि वीजपुरवठा खंडित होऊन त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ नये, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच रवी मोरे, मधुकर बनकर, अर्जुन आप्पा लहासे, मधुकर पवार सर, अनिल पाटील सर, रुपेश बनकर, गणेश वानखेडे, गणेश घोंगडे, संतोष बाविस्कर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version