सायन रुग्णालयाजवळील डॉ. आंबेडकर चौकात अर्धपुतळा उभारण्याची मागणी पुन्हा ऐरणीवर!
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्रानंतरही कार्यवाही नसल्याचा आरोप; महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजन बैठकीत सामाजिक कार्यकर्ते संजय भालेराव यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष
मुंबई | प्रतिनिधी – के. रविदादा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन आणि आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मुंबईतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा अर्धपुतळा उभारण्याची प्रलंबित मागणी पुन्हा उपस्थित करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते संजय रमेश भालेराव यांनी या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत अर्धपुतळा उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्राची अंमलबजावणी कधी?
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ जवळ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांचा अर्धपुतळा उभारण्यात यावा, यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ८ जुलै २०२४ रोजी संबंधित प्रशासनाला पत्र दिले होते. तसेच १२ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेकडेही या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता.
महाराष्ट्र शासनाच्या २ मे २०१७ रोजीच्या संबंधित परिपत्रकातील लागू तरतुदींचा विचार करून अर्धपुतळा उभारण्याबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या पत्रानंतरही प्रस्तावावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे त्यांनी बैठकीत निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांकडेही मांडला होता प्रस्ताव
संजय रमेश भालेराव यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली होती. यावेळी सायन रुग्णालयाच्या गेट क्रमांक ७ जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अर्धपुतळा उभारण्यासंदर्भातील प्रस्ताव आणि सूचना मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री स्तरावरही हा विषय मांडूनदेखील मागणीची पूर्तता झालेली नसल्याने संबंधित प्रशासनाने प्रस्तावाची सद्यस्थिती स्पष्ट करावी आणि पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशी मागणी भालेराव यांनी केली.
महापरिनिर्वाण दिनापूर्वी निर्णय घेण्याची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय योगदान अतुलनीय आहे. सायन रुग्णालयाजवळील चौकाला बाबासाहेबांचे नाव असताना त्या ठिकाणी त्यांचा अर्धपुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित राहणे खेदजनक असल्याची भूमिका भालेराव यांनी मांडली.
महापरिनिर्वाण दिनापूर्वी प्रशासनाने या मागणीवर ठोस निर्णय घ्यावा. बाबासाहेबांच्या स्मृती जतन करणाऱ्या आणि त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करणाऱ्या मागण्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
विविध मान्यवरांचा मागणीला पाठिंबा
या मागणीला पूज्य भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो, नागसेन कांबळे, महेंद्र साळवे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे, प्रकाश मोरे, प्रतीक कांबळे, रमेश जाधव, प्रदीप कांबळे, रवीभाऊ गरुड, श्रीकांत भिसे, सागर संसारे, किरण अशोक निकम आणि आशिष गाडे आदींनी पाठिंबा दर्शविला आहे.
आता या मागणीवर प्रशासन काय भूमिका घेते आणि महापरिनिर्वाण दिनापूर्वी अर्धपुतळा उभारण्याच्या प्रस्तावाबाबत कोणती कार्यवाही होते, याकडे आंबेडकरी अनुयायांचे लक्ष लागले आहे.
