Spread the love

धुळ्यात मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा; ‘कलाहर्ष’कडून नटराज पूजन

६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘आमचा काळ मस्त होता’ नाटकाच्या सरावाचा शुभारंभ; डिसेंबरमध्ये रंगणार स्पर्धेची प्राथमिक फेरी

धुळे | प्रतिनिधी

मराठी रंगभूमीचा समृद्ध वारसा जपण्याच्या उद्देशाने धुळे शहरातील कलाहर्ष बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त स्थानिक छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर येथे नटराज पूजन आणि आगामी ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सादर होणाऱ्या ‘आमचा काळ मस्त होता’ या नाटकाच्या सरावाचा शुभारंभ करण्यात आला.

नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

मराठी रंगभूमीला समृद्ध आणि देदीप्यमान परंपरा लाभली आहे. धुळे शहरात ही परंपरा जतन करण्यासाठी कलाहर्ष संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. रंगभूमी दिनाचे औचित्य साधून संस्थेचे पदाधिकारी आणि कलाकारांनी नाट्य मंदिरातील रंगमंचावर नटराजाचे पूजन केले. राहुल बागुल यांनी नटराजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून नटराजाला वंदन करण्यात आले.

‘आमचा काळ मस्त होता’ नाटकाच्या सरावाला प्रारंभ

नटराज पूजनानंतर दिग्दर्शक हर्षल राजेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी आगामी नाटकाच्या अधिकृत सरावाला सुरुवात केली. मुंबई येथील प्रसिद्ध लेखक कय्युम काझी लिखित ‘आमचा काळ मस्त होता’ हे दोन अंकी नाटक ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर केले जाणार आहे. नाशिक येथे होणाऱ्या या स्पर्धेत कलाहर्ष संस्थेचे हे नाटक धुळे शहराचे प्रतिनिधित्व करणार आहे.

स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर धुळेकर नाट्यरसिकांसाठी या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.

कलाकारांना मान्यवरांकडून शुभेच्छा

रंगभूमी दिनाच्या निमित्ताने झालेली ही सकारात्मक सुरुवात कलाकारांना राज्य नाट्य स्पर्धेत घवघवीत यश मिळवून देईल, असा विश्वास दिग्दर्शक हर्षल परदेशी, राहुल मंगळे आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला नाट्यप्रेमींसह नाटकातील कलाकार डॉ. कुणाल खैरनार, डॉ. रोहित लोहार, डॉ. अमित पागे, रेवती पागे, पौर्णिमा वाघ, धनंजय दीक्षित, शशिकांत नागरे, कल्पेश नेरकर, ज्ञानदा फरताडे, निनाद पोतदार, दुर्गा जिवरक आणि बालकलाकार लौकिक मोरे उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, धुळे शाखेचे खजिनदार लोकेश चौधरी आणि राहुल बागुल यांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रंगमंचावरील कलाकार आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version