शिक्षणाचा मंत्र देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन!
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”; शिक्षणाशिवाय प्रगतीचा मार्ग नाही, बाबासाहेबांचा जीवनप्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी
संघरत्न सपकाळे | भुसावळ
शिक्षणाशिवाय प्रगतीचा मार्ग नाही, हा विचार केवळ शब्दांतून नव्हे, तर आपल्या संपूर्ण जीवनप्रवासातून सिद्ध करणारे महामानव म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांनी दिलेला संदेश आजही प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देतो. शिक्षण हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन नसून स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे, हे बाबासाहेबांनी जगाला दाखवून दिले.
देशाने विज्ञान, तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रात मोठी प्रगती केली असली, तरी आजही काही भागांत विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी थर्माकोलच्या मचानीवरून नदी ओलांडावी लागते. शिक्षणासाठीच्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे हे वास्तव अंतर्मुख करणारे आहे. शिक्षणाच्या वाटेवर कितीही अडचणी आल्या, तरी त्या पार करण्याची जिद्द आणि चिकाटी असणे हाच खरा विद्यार्थीधर्म आहे. बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनप्रवास याच जिद्दीचा सर्वोत्तम आदर्श आहे.
साताऱ्यातील शाळेच्या पायरीवरून परिवर्तनाच्या युगाकडे…
७ नोव्हेंबर १९०० हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासातील एक प्रेरणादायी क्षण मानला जातो. याच दिवशी साताऱ्यातील प्रतापसिंग प्राथमिक शाळेत छोट्या ‘भिवा’ने म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा शाळेत प्रवेश घेतला. त्या बालपावलांनी केवळ शाळेच्या दिशेने वाटचाल केली नाही, तर पुढे संपूर्ण देशाला ज्ञान, समता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवणाऱ्या नव्या युगाची पायाभरणी केली. त्यामुळे ७ नोव्हेंबर हा दिवस ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
संघर्षातून ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत
सामाजिक विषमतेमुळे बाबासाहेबांना शालेय जीवनात अनेक अपमान आणि अडचणींचा सामना करावा लागला. वर्गात इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागणे, पाण्याच्या एका घोटासाठीही वंचित राहावे लागणे, अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षणाची कास कधीही सोडली नाही. याच जिद्दीच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षण घेतले आणि कोलंबिया विद्यापीठासह जगातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये आपल्या विद्वत्तेचा ठसा उमटवला.
बाबासाहेबांचा हा प्रवास सांगतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी ज्ञानाची भूक, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात. त्यांच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा धडा आहे.
२०१७ पासून ‘विद्यार्थी दिन’ म्हणून शासकीय पातळीवर साजरा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने २०१७ मध्ये शासन निर्णयाद्वारे ७ नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले. या दिवशी शाळांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित निबंध, वक्तृत्व, कविता वाचन आदी उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे.
आजच्या डिजिटल युगात माहिती सहज उपलब्ध होत आहे; मात्र माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रूपांतर करणे अधिक महत्त्वाचे आहे. मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना वाचन, चिंतन, अभ्यास आणि जिज्ञासा यांची जोड विद्यार्थ्यांनी कायम ठेवली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या बळावर इतिहास घडवला. त्यामुळे ७ नोव्हेंबर हा केवळ एका महामानवाच्या शाळा प्रवेशाचा दिवस नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाचा ध्यास घेण्याची, अडचणींवर मात करण्याची आणि स्वतःसह समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. बाबासाहेबांचा शिक्षणप्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सदैव प्रेरणेचा दीपस्तंभ राहील.
