दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली दिवाळीची गोडी!
मांडवा दिगर आणि भिलमडी येथील शेतकरी, शेतमजुरांना फराळ, मिठाई आणि कपड्यांचे वाटप; शिवसैनिक उमाकांत शर्मा यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
भुसावळ | संघरत्न सपकाळे
भुसावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिवसैनिक उमाकांत शर्मा यांनी स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविला. भुसावळ तालुक्यातील मांडवा दिगर आणि भिलमडी या गावांतील शेतकरी व शेतमजुरांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांना दिवाळीचा फराळ, मिठाई आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा संकल्प
बळीराजा रात्रंदिवस शेतात घाम गाळून संपूर्ण समाजासाठी अन्नधान्य पिकवतो. मात्र, दुष्काळी परिस्थितीत त्यालाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे हे समाजाचे कर्तव्य आहे, अशी भावना उमाकांत शर्मा यांनी व्यक्त केली.
त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला. दोन्ही गावांतील शेतकरी आणि शेतमजुरांच्या बांधावर जाऊन दिवाळीच्या शुभेच्छांसह फराळ, मिठाई आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. या अनोख्या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.
सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा दिवा
दिवाळी हा केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा सण नसून प्रेम, माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उत्सव आहे. गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांच्यासोबत सणाचा आनंद वाटल्यास समाजातील एकोपा अधिक दृढ होतो. शेतकऱ्यांना आपण एकटे नसून समाज आपल्या पाठीशी आहे, हा मानसिक आधार मिळतो. उमाकांत शर्मा यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून हाच सकारात्मक संदेश देण्यात आला.
शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग
या सामाजिक उपक्रमात कामगार सेना मंडळाध्यक्ष ललित मुथा, माजी शहरप्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ, शिवसेना शहरप्रमुख गणेश चौधरी, उपशहरप्रमुख राकेश खरारे, ॲड. मिलिंद काकडे, मंगेश धुमाळ, तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.
