Spread the love

संबोधी नगरात डॉक्टरच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; पाच तोळे सोने आणि ९० हजारांची रोकड लंपास!

घरी कोणीही नसल्याची संधी साधत घरफोडी; श्वान पथकासह तालुका पोलिसांकडून तपास सुरू

धुळे | प्रतिनिधी

धुळे शहरातील सुरत बायपास महामार्गालगत असलेल्या संबोधी नगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून मोठा ऐवज लंपास केला आहे. गंगाधाम पार्कमधील प्लॉट क्रमांक ३ येथे राहणारे डॉ. लक्ष्मीकांत भारडकर यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने आणि ९० हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

घरफोडीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. चोरीचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

चोरट्यांचा शोध सुरू

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश कसा केला, चोरी नेमकी कोणत्या वेळेत झाली आणि या गुन्ह्यात किती जणांचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास चोरट्यांचा माग लागण्याची शक्यता आहे.

संबोधी नगर परिसरात झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांसमोर चोरट्यांचा छडा लावण्याचे आव्हान आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version