Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणातून अनेक पिढ्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती!

शाळा प्रवेश दिवस हा वंचित-बहुजन समाजासाठी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस : मुकुंद नन्नवरे

पाळधी | प्रतिनिधी :

भारतीय समाजव्यवस्थेने वंचित, उपेक्षित, बहुजन समाजासह स्त्रियांनाही शिक्षणापासून दूर ठेवले होते. अशा परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात घेतलेल्या अनुभवांतून समाजाला स्वाभिमान, समता आणि विवेकशीलतेचा मार्ग दाखविला. त्यांच्या शाळा प्रवेश दिवसाची आठवण ही केवळ ऐतिहासिक घटना नसून, अनेक पिढ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक क्रांती घडविणारी प्रेरणादायी घटना आहे, असे प्रतिपादन धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांनी केले.

पाळधी येथील बौद्ध विहारात आयोजित शाळा प्रवेश दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. टी. सोनवणे होते.

‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार आजही दिशादर्शक

यावेळी मुकुंद नन्नवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक संघर्षाचे महत्त्व विशद केले. बाबासाहेबांच्या जीवनप्रवासातील अनुभवांनी वंचित आणि उपेक्षित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याचा मार्ग त्यांनी समाजासमोर ठेवला, असे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात आर. टी. सोनवणे म्हणाले की, विद्यार्थी दिवस हा वंचित समाजाच्या आयुष्यातील ऐतिहासिक क्रांतीचा दिवस आहे. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळेत पहिले पाऊल टाकले. पुढे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा विचार केवळ बहुजन समाजासाठीच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी दिला. या विचाराने प्रेरित होऊन बहुजन आणि वंचित समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील, सुनील सोनवणे, जगदीश सपकाळे, रत्नदीप नन्नवरे आणि सुनील आव्हाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version