“देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी”; चटणी-भाकर खाऊन वंचितची ‘काळी दिवाळी’!
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनातून निषेध
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी – शिवराम जाधव
भीषण दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी रस्त्यावर बसून चटणी-भाकर खाऊन सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.
“देवेंद्र-नरेंद्र तुपाशी, शेतकरी उपाशी” अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. दिवाळीसारख्या सणाच्या काळातही दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, सरकारकडून ठोस मदत मिळत नसल्याची खंत आंदोलकांनी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी, तसेच शेतकरी आणि शेतमजुरांसाठी ठोस मदत जाहीर करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सरकार दिवाळीचा आनंद साजरा करीत असताना शेतकरी मात्र उपासमारीच्या संकटाचा सामना करीत आहे. शेतकऱ्यांच्या ताटात चटणी-भाकरही उरलेली नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन आघाडीचा सरकारविरोधात निषेध
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चटणी-भाकर खाऊन ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याच्या प्रतीकात्मक कृतीतून आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि सरकारच्या धोरणांविरोधातील नाराजी व्यक्त केली.
