Spread the love

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी कृतिशीलचे उपक्रम कौतुकास्पद – अनिल पवार

‘दीपावली पहाट’ संगीत मैफिलीत सामाजिक बांधिलकीचा जागर; सभासदांच्या कलागुणांना उत्स्फूर्त दाद

धुळे | प्रतिनिधी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे, जनावरांच्या चारा-पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देणे, तसेच दिवाळीच्या आनंदापासून वंचित असलेल्या गरीब कुटुंबांना फराळाचे वाटप करणे, असे सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम कृतिशील निवृत्त अधिकारी व कर्मचारी संस्था, धुळे आणि जोगाईमाता सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक मंडळ, कापडणे यांच्या माध्यमातून राबविले जात आहेत. हे उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील मुख्य अभियंता अनिल पवार यांनी केले.

लक्ष्मीपूजनाच्या मंगल पर्वानिमित्त रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कल्याण भवन, धुळे येथे आयोजित ‘दीपावली पहाट’ संगीत मैफिलीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृतिशील आणि जोगाईमाता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सभासदांच्या कलागुणांना संगीत मैफिलीचे व्यासपीठ

या मैफिलीत संस्थेचे सभासद अविनाश मोरे, डी. डी. सोनार, राजेंद्र महाले, ॲड. धनराज भामरे, राजेश सोनार, अशोक खैरनार, गिरीधर खेडवनकर आणि अरुण विसपुते यांनी भावगीते, अभंग तसेच देशभक्तिपर गीतांचे सुरेल सादरीकरण केले. सभासदांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

‘संगीत समा ऑर्केस्ट्रा’च्या सौ. आसावरी गुरव, खान्देशातील सुप्रसिद्ध गायक पारिजात चव्हाण, ऋषिकेश चव्हाण आणि सुरेश चत्रे यांच्या बहारदार गायनाने मैफिलीची रंगत अधिकच वाढवली.

समाजहितासाठी कृतिशील सदैव तत्पर – योगेश पाटील

जोगाईमाता संस्थेचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी गोरगरीब आणि गरजूंच्या हितासाठी कृतिशील संस्थेच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यास सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करणे, तसेच गरजू कुटुंबांसाठी फराळ संकलन आणि वितरणाचे कार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कृतिशीलचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांनी सेवाकाळात मिळविलेले अनुभव, ज्ञान व कौशल्य समाजहितासाठी वापरावे, असे आवाहन केले. निवृत्तीनंतरही आपले छंद जोपासत जीवनाचा आनंद घेण्यासाठी कृतिशील संस्थेशी जोडले जावे, असेही त्यांनी नमूद केले.

निवृत्त शिक्षणाधिकारी जयप्रकाश पाटील यांनी संस्थेच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. तसेच काव्यवाचन आणि गीतगायनाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी राजेंद्र माळी, मेहेरगावचे उपसरपंच दिनेश पाटील, सौ. आशाताई पाटील, सौ. हर्षदा पाटील, सुनंदा निकम, अविनाश मोरे, मिलिंद मिस्त्री, देविदास शिरुडे, हरिश्चंद्र रेंडे, बी. एन. बिरारी, कैलास चौधरी, अंबादास खैरनार, प्रदीप जगताप, प्रा. ए. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले. संगीत, कला आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या ‘दीपावली पहाट’ मैफिलीने उपस्थितांना दीपावलीच्या आनंदासोबतच समाजसेवेची प्रेरणाही दिली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version