भारतीय बौद्ध महासभेची बौद्धाचार्य व केंद्रीय शिक्षक CET परीक्षा संपन्न
जळगाव जिल्ह्यातील २३ उपासक-उपासिकांचा सहभाग; संबोधी बुद्ध विहारात परीक्षेचे आयोजन
भुसावळ | संघरत्न सपकाळे
भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागामार्फत बौद्धाचार्य प्रमाणपत्र तसेच केंद्रीय शिक्षक-शिक्षिका पात्रता (CET) परीक्षा भुसावळ शहरातील यशोधरा नगर येथील संबोधी बुद्ध विहारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. भारतीय बौद्ध महासभेच्या जळगाव जिल्हा पूर्व विभागाच्या व्यवस्थापनाखाली झालेल्या या परीक्षेत जिल्ह्यातील एकूण २३ उपासक-उपासिकांनी सहभाग घेतला.
बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिसरण-पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या परीक्षेच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापक तथा जिल्हाध्यक्ष सुमंगल ऊर्फ रवींद्र अहिरे गुरुजी होते. मुख्य परीक्षक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू. जी. बोराडे गुरुजी, तर परीक्षक म्हणून ॲड. डी. के. संसारे गुरुजी उपस्थित होते.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा प्रियांकाताई अहिरे, संस्कार विभागाच्या उपाध्यक्षा सुमित्राताई सर्वटकर, संस्कार विभाग उपाध्यक्ष रवींद्र वानखेडे, कार्यालयीन सचिव शैलेंद्र जाधव, संरक्षण विभाग उपाध्यक्ष मेजर रमेश साळवे, ए. टी. सुरळकर संघटक, प्रकाश सरदार जिल्हा उपाध्यक्ष (पर्यटन विभाग), वसंतदादा लोखंडे सचिव (जिल्हा पर्यटन विभाग) आणि संघरत्न दामोदरे (संस्कार सचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.
२३ परीक्षार्थींचा सहभाग; लेखी व तोंडी परीक्षा
जिल्ह्यातून एकूण २३ उपासक-उपासिकांची या परीक्षेसाठी निवड करण्यात आली होती. त्यामध्ये बौद्धाचार्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी १२, केंद्रीय शिक्षक पदासाठी पाच आणि केंद्रीय शिक्षिका पदासाठी पाच प्रशिक्षित महिला उपासिकांचा समावेश होता. या सर्व परीक्षार्थींची लेखी परीक्षा घेण्यात आली, तर माजी श्रामणेरांची तोंडी परीक्षाही घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी केले. मुख्य परीक्षक यू. जी. बोराडे गुरुजी यांच्यासह उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व परीक्षार्थींचाही यावेळी सन्मानपूर्वक परिचय व स्वागत करण्यात आले.
जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे सहकार्य
परीक्षा केंद्रावर जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीने विशेष सहकार्य केले. भुसावळ तालुकाध्यक्ष राजेश आव्हाड, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे, रावेर तालुकाध्यक्ष गौतम अटकाळे, बोदवड तालुकाध्यक्ष शांताराम मोरे, जामनेर तालुकाध्यक्ष चंद्रकांत इंगळे, चोपडा तालुकाध्यक्ष भरत शिरसाठ, जिल्हा संघटक सुभाष सपकाळे, जळगाव तालुक्यातील जगदीश सपकाळे यांच्यासह जिल्हा संरक्षण विभागाच्या महिला सचिव वनिता साळवे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव वसंतदादा लोखंडे, केंद्रीय शिक्षक ए. टी. सुरळकर, रवींद्र मोरे, राजेश आव्हाड, आनंदमित्र सपकाळे, संघरत्न दामोदरे, रमेश खंडारे, गौतम अटकाळे, नितीन बोदडे, युवराज नरवाडे, सुरेंद्र हिवाळे आणि जनार्दन इंगळे यांनी सहकार्य केले.
संबोधी बुद्ध विहार समिती आणि भुसावळ तालुका कार्यकारिणीनेही परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
परीक्षार्थींना मान्यवरांचे मार्गदर्शन
परीक्षक ॲड. डी. के. संसारे, शैलेंद्र जाधव आणि यू. जी. बोराडे यांनी परीक्षार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष सुमंगल ऊर्फ रवींद्र अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे यांनी आभार प्रदर्शन केले. सरणत्तय ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
