वरणगाव गोळीबारातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू!
इन्स्टाग्रामवरील बनावट तरुणीच्या प्रोफाइलचा वापर करून रचला हल्ल्याचा कट; लोखंडी रॉडने मारहाण करून देशी कट्ट्यातून झाडल्या होत्या गोळ्या
कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हरपला; फेकरीतील दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
भुसावळ | संघरत्न सपकाळे
वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर तरुणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइल तयार करून युवकाला भेटण्यासाठी बोलावण्यात आले आणि तेथे त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून देशी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव सरफराज सय्यद साकिर सय्यद (वय २४, रा. काजीपुरा, मुक्ताईनगर) असे आहे.
या प्रकरणाचा तपास करत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने भूषण ऊर्फ बिस्ला राजू सावळे (वय २०) आणि सिद्धार्थ रामदास ढिवरे (वय २७), दोघेही रा. फेकरी, ता. भुसावळ, यांना अटक केली आहे.
बनावट इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मुक्ताईनगर येथील काजीपुरा परिसरातील सरफराज याला इन्स्टाग्रामवर एका तरुणीच्या नावाने तयार करण्यात आलेल्या बनावट प्रोफाइलवरून वारंवार मेसेज आणि कॉल करण्यात आले. गप्पा मारण्याच्या निमित्ताने त्याला वरणगाव येथील फुलगाव उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर बोलावण्यात आले.
लोखंडी रॉडने हल्ला; देशी कट्ट्यातून गोळीबार
सरफराज ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच तेथे दबा धरून बसलेल्या दोन युवकांनी दुचाकीवरून येत त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यावर आणि पायावर लोखंडी रॉडने वार केले. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर एका हल्लेखोराने कमरेतून देशी कट्टा काढून सरफराजवर दोन ते तीन गोळ्या झाडल्याचे समोर आले आहे. हल्ल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.
काही दिवस मृत्यूशी झुंज; अखेर प्राणज्योत मालवली
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सरफराजला तातडीने जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सरफराज हा कुटुंबातील प्रमुख कमावता व्यक्ती असल्याने त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
