धुळ्यात एकाच रात्री दोन ठिकाणी भीषण आग; गॅरेजसह कार्यालयाचे नुकसान!
चाळीसगाव रोडवरील पटेल गॅरेज आणि बीएसएनएल कार्यालयामागील कार्यालयाला मध्यरात्री आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
धुळे : प्रतिनिधी
धुळे शहरात एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या मोठ्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. चाळीसगाव रोडवरील पटेल नामक गॅरेज आणि टॉवर गार्डनजवळील बीएसएनएल कार्यालयाच्या मागे असलेल्या एका कार्यालयाला मध्यरात्री आग लागली. दोन्ही घटनांमध्ये नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.
दीडच्या सुमारास गॅरेजला आग
पहिली घटना मध्यरात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास चाळीसगाव रोडवरील पटेल नामक गॅरेजमध्ये घडली. अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले.
पावणेचार वाजता कार्यालय आगीच्या भक्ष्यस्थानी
दुसरी घटना मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास टॉवर गार्डनजवळील बीएसएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका कार्यालयात घडली. या कार्यालयाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
एका रात्रीत सहा ठिकाणी आगीच्या घटना
विशेष म्हणजे, एकाच रात्रीत धुळे शहरातील विविध भागांत एकूण सहा ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. यातील वरील दोन घटना मोठ्या स्वरूपाच्या होत्या, तर अन्य ठिकाणच्या आगी किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण आणि नुकसानीचा नेमका तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
