Spread the love

भुसावळमध्ये दिवाळीच्या उत्साहात दुर्घटना; पेटते रॉकेट मेडिकलच्या वरच्या मजल्यावर!

जामा मशीद परिसरातील मोतीलाल कालूराम मेडिकलच्या इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

भुसावळ : प्रमोद पाटील

दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच भुसावळ शहरात आगीची घटना घडली. रविवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास जामा मशीद परिसरातील मोतीलाल कालूराम मेडिकलच्या वरच्या मजल्यावर पेटते रॉकेट जाऊन पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

पेटते रॉकेट इमारतीवर पडल्याने आग

मिळालेल्या माहितीनुसार, जामा मशीद परिसरातील मोतीलाल कालूराम मेडिकलच्या वरच्या मजल्यावर रविवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. दिवाळीनिमित्त उडवण्यात आलेले पेटते रॉकेट इमारतीच्या वरच्या मजल्यावर पडल्याने आग लागल्याचे प्राथमिकरीत्या सांगण्यात येत आहे.

जामा मशीद परिसर गजबजलेला असल्याने आग लागल्याचे समजताच नागरिकांमध्ये घबराट पसरली. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली.

अग्निशमन दलाची तातडीने धाव

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी विलंब न करता घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग इमारतीच्या अन्य भागांत किंवा शेजारील दुकानांमध्ये पसरण्यापूर्वीच ती आटोक्यात आणण्यात यश आले.

गजबजलेल्या बाजारपेठेतील ही आग वेळेत नियंत्रणात आल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

फटाके उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन

या घटनेच्या पार्श्वभूमीवर फटाके आणि रॉकेट उडवताना नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. गजबजलेल्या वस्त्या, बाजारपेठा आणि दुकानांच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version