मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून भवरखेड्यात पाड्यावरील बांधवांची दिवाळी गोड!
दिवाळीचा गोड शिधा वाटप करून वंचित कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक
भवरखेडे, ता. धरणगाव : दिवाळीचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह आणि समाधान घेऊन येतो. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक गरजू कुटुंबांना सणाचा आनंद मनमुराद लुटता येत नाही. हीच जाणीव ठेवून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून भवरखेडे येथील पाड्यावर राहणाऱ्या बांधवांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत पाड्यावरील नागरिकांना दिवाळीनिमित्त गोड शिध्याचे वाटप करण्यात आले. सणासुदीच्या काळात मिळालेल्या या मदतीमुळे गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, पाड्यावरही दिवाळीचा उत्साह निर्माण झाला.
सामाजिक बांधिलकीचा जपला वसा
समाजातील प्रत्येक घटकाला सणाचा आनंद घेता यावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. दिवाळी केवळ स्वतःच्या कुटुंबापुरती मर्यादित न ठेवता वंचित आणि गरजू बांधवांसोबत आनंद वाटून घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. गरजू कुटुंबांच्या आनंदात सहभागी होत दिवाळीचा गोडवा वाढविणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
