उत्सवाचा खरा आनंद समाजाच्या उपयोगी पडण्यातच! — पालकमंत्री गुलाबराव पाटील
डीजे, बँड आणि ढोलताशांचा खर्च टाळून त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम; पाळधी खुर्दमधील ४०० कुटुंबांना पाण्याच्या जारांचे वाटप
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीचे दर्शन; पालकमंत्र्यांकडून मंडळाच्या उपक्रमाचे विशेष कौतुक
पाळधी/जळगाव, दि. ११ (प्रतिनिधी) : उत्सवाचा खरा आनंद केवळ जल्लोषात नसून समाजाच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करण्यात आहे. उत्सवातून मिळणारा आनंद गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलविण्यासाठी वापरला, तर त्याचे महत्त्व अधिक वाढते, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाळधी खुर्द येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ आणि जीपीएस मित्र परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आदर्शवत उपक्रम राबविला. दुर्गोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे, बँड आणि ढोलताशांवर होणारा खर्च टाळून त्या रकमेतून प्रभाग क्रमांक ४ मधील तब्बल ४०० कुटुंबांना प्रत्येकी एक पाण्याचा जार वितरित करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम पार पडला.
उत्सवाच्या खर्चाला समाजहिताची जोड
यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “दुष्काळाच्या काळात नागरिकांची गरज ओळखून उत्सवाचा खर्च समाजहितासाठी वापरणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. उत्सवातून आनंद मिळतोच; मात्र त्या आनंदातून गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान फुलविणे, हे त्याहून मोठे पुण्याचे काम आहे. त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ आणि जीपीएस मित्र परिवाराने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. इतर मंडळांनीही अशा विधायक उपक्रमांचा आदर्श घ्यावा.”
पाळधी खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य सुधाकर (भैय्या) महाजन यांच्या पुढाकाराने आणि युवा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिनगर येथील त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतलेल्या या निर्णयाचे पालकमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून यापूर्वीही आरोग्य, शिक्षण आणि विविध सामाजिक क्षेत्रांत लोकहिताचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच सेवाभावी परंपरेला अनुसरून पाण्याच्या जारांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
आदिवासी भिल्ल बांधवांच्या समस्या प्राधान्याने सोडवा!
कार्यक्रमानंतर धरणगाव तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाजाच्या बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. घरकुल योजनांचा लाभ, शिधापत्रिका (रेशनकार्ड) आणि जात प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी या प्रमुख मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
पालकमंत्र्यांनी बांधवांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना अर्जांची तातडीने पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. शासनाच्या प्रचलित नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जीपीएस मित्र परिवाराचे सर्वेसर्वा प्रतापराव पाटील, पाळधीचे सरपंच शरद कोळी, उपसरपंच दिलीपबापू पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिलभाऊ कासट, सुधाकर महाजन, डिगू माळी, चंदू माळी, गणेश माळी, नाना फुलपगार, सुभाष महाजन, पत्रकार दीपक झंवर, पंकज कोळी यांच्यासह त्रिनेत्र दुर्गोत्सव मंडळ व जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूषण महाजन यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांनी मानले.
