Spread the love

भुसावळमध्ये १४ हजार ५५७ मतदारांच्या नावांवर हरकती; मतदार यादीतील कथित घोळाविरोधात सर्वपक्षीय आक्रमक!

फॉर्म क्रमांक ७ च्या कथित गैरवापराचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

सर्वपक्षीय बैठक व संयुक्त पत्रकार परिषदेत प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी; न्याय न मिळाल्यास जनआंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी – प्रमोद पाटील) : भुसावळ शहरातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेदरम्यान तब्बल १४ हजार ५५७ मतदारांच्या नावांवर हरकती नोंदवण्यात आल्याची बाब समोर आली आहे. मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म क्रमांक ७ चा कथित गैरवापर करून रिकामे अर्ज दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळचे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देऊन सखोल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या कथित प्रकारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून, मतदारांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले आहेत. आज शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सर्वपक्षीय बैठक आणि संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

काय आहे नेमके प्रकरण?

जन्मापासून भुसावळ शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावांवरही हरकती नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. फॉर्म क्रमांक ७ चा कथित बेकायदेशीर वापर करून रिकामे अर्ज दाखल करण्यात आल्याने पात्र मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सामान्य नागरिकांनी आपल्या मतदानाच्या हक्कासाठी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल उपस्थित करत एकाही पात्र मतदाराचे नाव चुकीच्या पद्धतीने वगळले जाऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे हरकती दाखल केल्या असल्यास त्यांची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव विनाकारण मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे आश्वासन दिल्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठक अन् पत्रकार परिषद

या गंभीर विषयावर अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सर्वपक्षीय बैठक व संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीला उपस्थित प्रमुख नेते व पदाधिकारी :

  • अनिल चौधरी (नेतृत्व)

  • समाधान महाजन सर (जिल्हाध्यक्ष, शिवसेना – शिंदे गट)

  • जगनभाई सोनवणे (माजी नगरसेवक)

  • काँग्रेस शहराध्यक्ष

  • गणेश सोनवणे (शहराध्यक्ष, शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)

  • बाळा पवार (वंचित बहुजन आघाडी)

  • अजय पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट)

  • उल्हास पगारे (नगरसेवक)

  • गायत्री भांगळे (लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा)

  • वर्षा तल्लारे

  • मनसेचे कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी.

अनिल चौधरी यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

पत्रकार परिषदेत बोलताना अनिल चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “नामदार संजय सावकारे यांचे मंत्रीपद पुढील दोन महिन्यांत जाईल. मंत्रिमंडळ विस्तार पुढील दोन महिन्यांत होणार असून, त्यांचे बुलढाण्याचे पालकमंत्रीपद तर आधीच गेले आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

मतदारांच्या हक्कांशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. नियम सर्वांसाठी समान आहेत, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट; जनआंदोलनाचा इशारा

या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार उद्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार व निवेदन सादर करणार आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने आणि पारदर्शक चौकशी करून न्याय दिला नाही, तर भुसावळकरांच्या मतदानाच्या हक्कासाठी मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.

मतदार यादीतील हरकतींची सत्यता, फॉर्म क्रमांक ७ चा वापर नियमानुसार झाला आहे की नाही आणि पात्र मतदारांच्या हक्कांचे संरक्षण कसे केले जाणार, याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेते, याकडे भुसावळकरांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version