Spread the love

आदिवासी बांधवांपर्यंत प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ पोहोचलाच पाहिजे : आमदार नंदकिशोर महाजन

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; रावेरमध्ये पत्रकार परिषदेत उपक्रमांची रूपरेषा जाहीर

रावेर | अक्षय वाघ : शासन आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत आहे. मात्र या योजनांचा प्रत्यक्ष लाभ तळागाळातील शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राज्यभरात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त रावेर पंचायत समितीच्या सभागृहात आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग आणि पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार महाजन यांनी सप्ताहभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

सहा दिवसांत विविध लोककल्याणकारी उपक्रम

या सेवा सप्ताहात आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सप्ताहातील प्रमुख कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

  • १३ नोव्हेंबर : न्यूक्लिअस बजेट योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरण.

  • १४ नोव्हेंबर : आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मारकांची स्वच्छता आणि दीपोत्सव.

  • १५ नोव्हेंबर : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सव.

  • १६ नोव्हेंबर : आधारकार्ड आणि शासकीय कागदपत्रांसाठी विशेष सेवा शिबिर.

  • १७ नोव्हेंबर : आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर.

  • १८ नोव्हेंबर : आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण कार्यक्रम आणि सेवा सप्ताहाचा समारोप.

शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यावर भर

या सेवा सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार आहे. आवश्यक कागदपत्रे आणि शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यातील अडचणी कमी होऊन आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

योजना जाहीर करण्यापेक्षा लाभ पोहोचविणे महत्त्वाचे

केवळ शासकीय योजना जाहीर करून चालणार नाही, तर प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ पोहोचविणे ही प्रशासनाची खरी जबाबदारी आहे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांच्या प्रवाहात आणावे, असा स्पष्ट संदेश आमदार नंदकिशोर महाजन यांनी दिला.

अधिकारी व पदाधिकारी उपस्थित

या पत्रकार परिषदेला तहसीलदार संजय तायडे, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी पद्माकर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष अरुण शिंदे, मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील, दुर्गेश पाटील, नगरसेविका सीमा जमादार, कलिंदर तडवी, सहायक गटविकास अधिकारी के. पी. वानखेडे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version