शेतकऱ्यांच्या हालाखीची जाणीव ठेवत बळीराजा लोकोत्सव समितीचा साधेपणाचा आदर्श!
वाजंत्री, मिरवणूक आणि दिखाव्याला फाटा; महात्मा बळीराजांना साधेपणाने अभिवादन करीत जपल्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना
धरणगाव : प्रतिनिधी – वाल्मिक पाटील
राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना, त्यांच्या दुःखाची जाणीव ठेवत धरणगाव येथील बळीराजा लोकोत्सव समितीने यंदा साधेपणाने महात्मा बळीराजा उत्सव साजरा केला. वाजंत्री, मोठे फलक, मिरवणूक आणि अनावश्यक दिखाव्याला फाटा देत धरणी चौकात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ महात्मा बळीराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उत्सवापेक्षा शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव महत्त्वाची असल्याचा संवेदनशील संदेश समितीने आपल्या कृतीतून दिला.
शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा संदेश
शेतकऱ्यांच्या कष्टावर संपूर्ण समाजाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे आज अनेक शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत मोठा खर्च करून उत्सव साजरा करण्याऐवजी साधेपणाने महात्मा बळीराजांना अभिवादन करण्याचा निर्णय समितीने घेतला. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या दुःखाशी नाते जोडणे आणि सामाजिक संवेदनशीलता जपणे हाच यंदाच्या उत्सवाचा केंद्रबिंदू ठरला.
बळीराजांचे राज्य म्हणजे समानता आणि समृद्धीचा विचार
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी केले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी महात्मा बळीराजांच्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देत त्यांच्या न्यायप्रिय आणि समतावादी राज्यव्यवस्थेचे महत्त्व विशद केले.
माळी समाजाचे माजी अध्यक्ष विठोबा माळी आणि पाटील समाजाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनीही महात्मा बळीराजांच्या कार्याची आठवण करून दिली. ‘इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो’ ही भावना व्यक्त करत बळीराजाचे राज्य म्हणजे सर्वांच्या सुखाचा, समृद्धीचा आणि समानतेचा विचार करणारे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध समाजांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते उपस्थित
या अभिवादन कार्यक्रमाला माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पालिकेचे गटनेते निलेश चौधरी, भोई समाजाध्यक्ष सुनील जावरे, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, मातंग समाजाध्यक्ष सोमा चित्ते, माळी समाज उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, भाजपचे पुनिलाल महाजन, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन, विनोद रोकडे, नदीम काझी, निलेश पवार, सुधाकर मोरे सर, पी. डी. पाटील, कैलास पवार सर, महेंद्र तायडे, पंडित गुरुजी चौधरी, दशरथ महाजन, महेशबाबा पाटील, गजानन महाजन, मनोज माळी, पिंटू महाजन, काँग्रेसचे रामचंद्र माळी, सलीम बेलदार, सुनील सोनार, दिनेश पाटील, सुनील सोनवणे, राष्ट्रवादीचे मोहित पवार, जुनेद बागवान, सागर महाले आणि प्रफुल्ल पवार यांच्यासह विविध समाजांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक समाजाचे हेमंतराव माळी यांनी केले, तर राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरखनाथ देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बळीराजा लोकोत्सव समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
