Spread the love

पत्रकारांच्या हक्कांसाठी लोकशाही पत्रकार महासंघाचा भव्य राज्यस्तरीय मेळावा परभणीत!

पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन; प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांच्या पुढाकारातून पत्रकार प्रशिक्षण, सहविचार बैठक आणि पदाधिकारी नियुक्ती सोहळ्याचे आयोजन

मुंबई | प्रतिनिधी : पत्रकारांचे हक्क, संरक्षण, सुरक्षा आणि सन्मान यांसाठी संघटनात्मक ताकद उभी करण्याच्या उद्देशाने लोकशाही पत्रकार महासंघ, भारत यांच्या वतीने रविवार, दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी परभणी येथे भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात राज्यस्तरीय सहविचार बैठक, पत्रकार प्रशिक्षण आणि पदाधिकारी नियुक्ती समारंभ पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला परभणीचे खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण आणि पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (IPS) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव राहणार आहेत.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तथा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. संतोषकुमार जयस्वाल, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रतापराव साळुंखे, राष्ट्रीय महामंत्री टी. माधव, सरचिटणीस हलिमाताई शेख, दैनिक लोकनेताचे मुख्य संपादक तथा राष्ट्रीय संघटनमंत्री ज्ञानेश्वर बुधवत, जालना महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा दैनिक ज्योती बने ज्वालाच्या संपादिका आयेशा मुलानी, डिजिटल मीडिया अध्यक्ष मेहबूब शेख, राज्य संघटक रहीम खान आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.

पत्रकारांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन

महाराष्ट्रातील पत्रकार, संपादक आणि मीडिया प्रतिनिधींना सक्षम संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या शासन व प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे आणि न्याय्य हक्कांसाठी राज्यभर संघटनात्मक ताकद निर्माण करणे, हा या मेळाव्यामागील प्रमुख उद्देश आहे.

मेळाव्यात पत्रकारांचे हक्क, संरक्षण, सुरक्षा, सन्मान, पत्रकारितेतील नैतिक मूल्ये, डिजिटल माध्यमांसमोरील बदलती आव्हाने, शासकीय योजना, पत्रकार प्रशिक्षण आणि पत्रकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर विचारमंथन होणार आहे. तसेच महासंघाच्या विविध पदांवरील पदाधिकारी नियुक्ती समारंभ पार पडणार असून, आगामी संघटनात्मक वाटचालीची दिशाही निश्चित केली जाणार आहे.

राज्यभरातील पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन

प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे कार्य राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि शहरांपर्यंत विस्तारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांवर सामूहिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व संपादक, पत्रकार, मीडिया प्रतिनिधी तसेच राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि शहर स्तरावरील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांनी केले आहे.

कार्यक्रमाचा तपशील

  • दिनांक : रविवार, १५ नोव्हेंबर २०२६

  • वेळ : सकाळी ११:३० वाजता

  • स्थळ : सावली शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस), परभणी

  • संपर्क : ९८३४००९६५७

पत्रकारांचा सन्मान, हक्कांचे संरक्षण आणि संघटनात्मक सक्षमीकरणासाठी चला, एकत्र येऊया!

Share.
Leave A Reply

Exit mobile version