Spread the love

धुळ्याच्या तात्पुरत्या बसस्थानकातील गैरसोयींवर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; अधिकाऱ्यांना घेराव

धूळ, अंधार, CCTVचा अभाव, पाणी व स्वच्छतागृहांची गैरसोय; वरिष्ठ आगारप्रमुख संदीप निकम आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली बसस्थानकाची पाहणी

धुळे : शहरातील मुख्य बसस्थानकाचे काम सुरू असल्याने बाजूच्या मैदानात तात्पुरते बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. धूळ, रात्रीच्या वेळी अंधार, CCTV कॅमेऱ्यांचा अभाव, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था अशा विविध समस्यांवरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी वरिष्ठ आगारप्रमुख संदीप निकम आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांना घेराव घालत तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी केली.

धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात

तात्पुरत्या बसस्थानकासाठी वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण मैदानात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. बसेसच्या येण्या-जाण्यामुळे सतत धुळीचे लोट उडत असून महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याच्या रुग्णांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिवसेनेने निवेदनात म्हटले आहे. धुळीमुळे डोळे आणि घशाचे त्रासही वाढत असल्याने मैदानावर दिवसातून किमान तीन ते चार वेळा टँकरने पाणी मारण्याची मागणी करण्यात आली आहे.

रात्री अंधार; महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

रात्रीच्या वेळी तात्पुरत्या बसस्थानकात पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात असतो. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिला, लहान मुले आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी तातडीने हायमास्ट किंवा LED दिवे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली.

CCTV नसल्याने सुरक्षेची चिंता

तात्पुरत्या बसस्थानक परिसरात CCTV कॅमेरे नसल्याने चोरी, छेडछाड किंवा अन्य अनुचित प्रकार घडल्यास त्याची नोंद आणि पुरावे मिळविण्यात अडचणी येऊ शकतात, अशी चिंता शिवसेनेने व्यक्त केली. संपूर्ण परिसर CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणी

तात्पुरत्या बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय नसल्याचे, तसेच महिलांसाठी स्वच्छ टॉयलेट आणि बाथरूम उपलब्ध नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि महिलांसाठी तात्पुरती स्वच्छतागृहे तातडीने उभारावीत, अशी मागणी करण्यात आली.

भाऊबीजेमुळे गर्दी; जादा बसेस सोडण्याची मागणी

भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर महिला प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना जादा बसेसची पुरेशी व्यवस्था नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. गर्दीचे योग्य नियोजन करून प्रवाशांच्या मागणीनुसार जादा बसेस सोडाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

सहा प्रमुख मागण्यांचे निवेदन

शिवसेनेच्या वतीने विभाग नियंत्रक आणि धुळे आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत :

  1. संपूर्ण मैदान व रस्त्यावर दिवसातून किमान तीन ते चार वेळा टँकरने पाणी मारावे.

  2. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशासाठी हायमास्ट किंवा LED दिवे बसवावेत.

  3. संपूर्ण तात्पुरत्या बसस्थानक परिसरात CCTV कॅमेरे बसवावेत.

  4. प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी.

  5. महिलांसाठी स्वच्छ तात्पुरती टॉयलेट व बाथरूमची सुविधा उभारावी.

  6. जादा बसेस सोडून गर्दीचे योग्य नियोजन करावे.

प्रवाशांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन या उपाययोजना तातडीने कराव्यात. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित

या वेळी शिवसेना महानगरप्रमुख संजय वाल्हे, आबा कदम, डिगंबर चौधरी, विष्णू जावडेकर, मिलिंद चौधरी, प्रफुल्ल सोनवणे, किरण आगलावे, सतीश काळे, समाधान कुंमरे, बबलू शेख, अस्लम खाटीक, शुभम जगदाळे, हेमंत घटे, अजय जगदाळे, सागर देवरे, गणेश शिंदे, शरद गोसावी, प्रतीक शिंदे, आबा सैंदाणे, विजय देवरे, देवेंद्र गायकवाड, पंकज नगराळे, दिनेश चव्हाण, चेतन भारती, स्वप्नील मोरे, हरी मोरे, विकी मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version