होळनांथे–भावेर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार!
अजंदे बुद्रुक-पिंपळे शिवारातील चोहऱ्या नाल्याजवळ घटना; स्थानिक नागरिकांकडून वनविभागाला माहिती
अजंदे बुद्रुक : होळनांथे–भावेर रस्त्यावरील अजंदे बुद्रुक-पिंपळे शिवारातील चोहऱ्या नाल्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस (लकडबग्घा) या वन्यप्राण्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना हा वन्यप्राणी मृत अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिक आणि सर्पमित्राने तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
पहाटे प्रवाशांना आढळला मृत वन्यप्राणी
मिळालेल्या माहितीनुसार, होळनांथे–भावेर मार्गावरून पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना चोहऱ्या नाल्याजवळ तरस मृत अवस्थेत दिसून आला. अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच अजंदे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी संजय भील, सर्पमित्र मुख्तार शहा आणि बबलू पाटील यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता
या परिसरात दुर्मिळ वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर आणि रस्त्यावरील अपघातांच्या शक्यतेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून मृत वन्यप्राण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
