Spread the love

बहिणीने भावावर ओवाळले आयुष्य; स्वतःची किडनी दान करून दिले जीवनदान!

भाऊबीजेच्या नात्याला कृतीतून नवी उंची; शोभा ठाकरे यांच्या धाडसी निर्णयातून अवयवदानाचा मोलाचा संदेश

भडगाव प्रतिनिधी : गणेश रावळ

भाऊबीज म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि नात्यातील विश्वासाचा सण. या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी औक्षण करते; मात्र याच नात्याला प्रत्यक्ष कृतीतून वेगळी उंची देणारी हृदयस्पर्शी घटना भडगावमध्ये समोर आली आहे. आपल्या आजारी भावाला नवजीवन मिळावे, यासाठी सख्ख्या बहिणीने स्वतःची किडनी दान केली. सौ. शोभा दिलीप ठाकरे यांच्या या निःस्वार्थ निर्णयामुळे भावाला जीवनदान मिळण्यास मदत झाली असून, त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भावाची ढासळती प्रकृती पाहून बहिणीचा धाडसी निर्णय

भडगाव येथील लाडकुबाई माध्यमिक विद्यामंदिरात ग्रंथपाल म्हणून कार्यरत असलेले लक्ष्मण शिवाजी सावंत गेल्या काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. दोन भाऊ आणि चार बहिणी अशा सावंत कुटुंबात भावंडांचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. भावाची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याचे पाहून बहीण शोभा ठाकरे यांनी त्याला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

केवळ भावाची काळजी व्यक्त न करता त्याच्या आयुष्यासाठी स्वतःच्या आरोग्याशी निगडित मोठा निर्णय घेण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. त्यांच्या या निर्णयाने बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे.

नाशिकमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण

या आव्हानात्मक प्रवासात शोभा ठाकरे यांना त्यांचे पती दिलीप ठाकरे आणि कुटुंबीयांचे खंबीर पाठबळ लाभले. नाशिक येथील मानवता हॉस्पिटलमध्ये २७ ऑक्टोबर रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. सध्या शोभा ठाकरे आणि लक्ष्मण सावंत या दोघांचीही प्रकृती सुरक्षित असून, त्यांच्यात सुधारणा होत असल्याची माहिती आहे.

अवयवदानातून माणुसकीचा संदेश

आजही समाजात अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती होण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत शोभा ठाकरे यांनी घेतलेला निर्णय केवळ एका कुटुंबासाठी दिलासा देणारा नसून, अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. त्यांच्या त्यागातून समाजाला माणुसकी, नात्यांमधील निःस्वार्थ प्रेम आणि अवयवदानाबाबत सकारात्मक विचार करण्याचा संदेश मिळत आहे.

शोभा ठाकरे यांच्या या धाडसी निर्णयाचे भडगाव तालुक्यासह पंचक्रोशीत कौतुक होत आहे. लक्ष्मण सावंत यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि दोघेही लवकर पूर्णपणे निरोगी व्हावेत, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version